महाराष्ट्राची प्रतिकृती असलेल्या केकमधून विदर्भाचा भाग कापून वेगळा केल्याप्रकरणी ज्येष्ठ विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी कालच वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही आज मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भवाद्यांनी तयार केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या ध्वजाची होळी केली, त्यामुळे अ‍ॅड.अणेंच्या दिलगिरीनंतरही अखंड महाराष्ट्रवाद्यांचा राग शांत झाल्याचे दिसत नाही.
अ‍ॅड.अणे यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरल्यानंतर अखंड महाराष्ट्र समर्थक मनसे आणि शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. अ‍ॅड. अणे यांनी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून स्वतंत्र विदर्भ राज्याचा वेगळा ध्वजही फडकाविला होता.
अ‍ॅड. अणे यांच्या ‘केक’ प्रकरणावरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. अणे यांच्यासह ठराविक लोकांचीच विदर्भची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
सोमवारी अ‍ॅड. अणे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी येथील गोकूळपेठ भागात विदर्भध्वज जाळून अ‍ॅड. अणे यांचा निषेध केला. मनसेचे नेते प्रशांत पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अ‍ॅड.अणे यांनी अखंड महाराष्ट्राचा ध्वज पेटविला होता, त्याला सडेतोड उत्तर म्हणून विदर्भाचा ध्वज जाळण्यात आला. मुठभर लोकांच्या मदतीने अ‍ॅड.अणे हे विदर्भाची मागणी करीत आहेत. आतापर्यंत ते कोठे होते?, असा सवाल करीत त्यांच्या आंदोलनाला जनसमर्थन नाही, असे पवार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.