अमरावती: राज्यात सध्या उष्णतेची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहचला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे काय?
सध्या मध्य भारत, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली पंजाब, हरियाणा, या प्रदेशावर पाऊस पडण्यासाठी आवश्यक हवामानशास्त्रीय परिस्थिती नसल्याने या संपूर्ण भागात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थानकडून विदर्भाकडे कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने पुढील सात दिवस विदर्भात आणि प्रामुख्याने अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे, असे येथील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी सांगितले आहे.
नेमका इशारा काय?
भारतीय हवामान खात्याने २१ मे रोजी अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त सकाळी ११ ते सायंकाळी ६ या कालावधीत घराच्या बाहेर पडण्याचे टाळावे. या जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकते. उर्वरित विदर्भात सुद्धा तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे प्रा. अनिल बंड यांनी म्हटले आहे. याशिवाय २२ आणि २३ मे रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भात पूर्व मोसमी पाऊस २५ तारखेनंतरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सात दिवस गंभीर परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे प्रा. अनिल बंड यांचे म्हणणे आहे.
भारतातील उष्ण शहरामध्ये अमरावती
गेल्या काही दिवसांपासून अमरावती, अकोला, वर्धा ही शहरे भारतातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत आली आहेत. आग ओकत असल्यामुळे दुपारी १२ वाजल्यापासूनच या शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. काल अमरावतीत ४६.८, वर्धा ४६.५, अकोला ४६.०० तर नागपूर येथे ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
