नागपूर : भारतात मोसमी पावसाचे आगमन झाले, पण विदर्भातील उन्हाचा पारा काही कमी होईना. जून महिन्याकडे वाटचाल सुरु झाली असतानाच सूर्यनारायणाचा कोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ४६ अंशाहून अधिकचे तापमान विदर्भात नोंदवले जात असताना विदर्भातील जलाशयावर स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कायम आहे.
स्थलांतरीत पक्ष्यांचा मुक्काम का वाढतो
पावसाळा संपताच आणि हिवाळ्याची चाहूल लागताच भारतात मोठ्या संख्येने विदेशी पक्षी स्थलांतर करुन येतात. तर हिमालयाकडूनही अनेक पक्षी विदर्भात येतात. फेब्रुवारीच्या अखेरीस हे पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात. यावेळी या पक्ष्यांचा मुक्काम आश्चर्यात पाडणारा ठरला. मे महिना संपत आला तरीही या स्थलांतरीत पक्ष्यांनी त्यांचा मुक्काम हलवलेला नाही. चक्कवाक, पट्टकादम हंस हे हिमालयीन पाहूणे विदर्भातच मुक्काम ठोकून आहेत. ‘युरेशियन क्युरल्यू’ हा पक्षीसुद्धा विदर्भातच थांबला आहे. आजारी असल्यास, जखमी असल्याच किंवा इतर काही कारणांमुळे मागे राहिल्यास त्यांचा मुक्काम वाढतो. मात्र, काहीही का असेना त्यांच्या या मुक्कामामुळे पक्षी अभ्यासकांना या नोंदी घेता आल्या.
तब्बल ३००हून अधिक पक्षीप्रजातीची नोंद
जागतिक पक्षीगणना नुकतीच पार पडली. या जागतिक पक्षीगणनेत संपूर्ण विदर्भातून पक्षीप्रेमी, पक्षीअभ्यासक सहभागी झाले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. पक्षी प्रजातीच्या नोंदीसाठी असलेले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणजे ‘ई-बर्ड’ प्रणाली. या डिजिटल आंतरराष्ट्रीय प्रणालीवर आतापर्यंत तब्बल ३०० हून अधिक पक्षीप्रजातींची नोंद घेण्यात आली. या गणनेदरम्यान पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासकांनी अनेक चकीत करणारी निरीक्षणे नोंदवली. त्यात हिमालयाहून येणाऱ्या काही पक्षांनी ४६ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाही विदर्भातच मुक्काम ठोकल्याचे दिसून आले. एरवी हे पक्षी फेब्रुवारीपर्यंत किंवा जास्तीत जास्त मार्चपर्यंत मुक्कामी असतात आणि त्यानंतर निघून जातात.
उन्हाच्या तडाख्यातही पक्ष्यांचा जलविहार
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जलाशयांवर हिमालयीन ‘चक्रवाक’ आणि ‘पट्टकादम हंस’ हे पक्षी आढळले. मार्चदरम्यान खरं तर ते सायबेरिया आणि तिबेटच्या दिशेने निघून जातात. मात्र, ९ मे रोजी ते ४५ अंश सेल्सिअसमध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जलाशयावर विहार करताना आढळले. तर समुद्राच्या खाड्यांवर आणि किनारपट्टीच्या चिखलात लांब व बाकदार चोचीने अन्न शोधणारा ‘युरेशियन क्युरल्यू’ हा पक्षी नागपूर व अमरावतीच्या मोठ्या जलाशयावर आढळून आला. समुद्र सोडून भारतातील जलाशयांवर भर उन्हात त्यांचे मुक्कामी असणे हे पक्षी अभ्यासकांना देखील आश्चर्यचकीत करणारे ठरले आहे.
