नागपूर : जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर काहीशी सावरण्याची अपेक्षा असताना ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने विदर्भातील पावसाची तूट वाढली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस झाला असला, तरी एकट्या ऑगस्टमध्येच पावसाची तूट ५८ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसाला विशेष महत्त्व आले आहे.
पश्चिम विदर्भातील स्थिती
विदर्भात ऑगस्टमध्ये सरासरी २९७.१ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात १२५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षाही कमी पाऊस ऑगस्टमध्ये झाला. पावसाची ही कमतरता मात्र संपूर्ण विदर्भात सारखी नाही. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तूट अधिक तीव्र आहे, तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांनी तुलनेने चांगली स्थिती राखली आहे. ऑगस्टमध्ये अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अकोल्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८४ टक्के, तर अमरावतीत ८२ टक्के पाऊस कमी झाला. यवतमाळमध्ये ७८ टक्के, वर्ध्यात ७३ टक्के आणि नागपूर व वाशिममध्ये प्रत्येकी ७१ टक्के तूट आहे. म्हणजेच पश्चिम विदर्भापासून मध्य विदर्भापर्यंत ऑगस्टचा पाऊस मोठ्या प्रमाणात कमी राहिला आहे.
पूर्व विदर्भातील स्थिती
पूर्व विदर्भात मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्येही ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी तीन महिन्यांची एकत्रित स्थिती पाहता गोंदियाची तूट अवघी दोन टक्के आहे. गडचिरोलीत १९ आणि भंडाऱ्यात १६ टक्के तूट आहे. यामुळे विदर्भातील पावसाची कमतरता ही एकसारखी नसून विभागनिहाय तिची तीव्रता वेगळी असल्याचे दिसते. जून ते ऑगस्ट या कालावधीत विदर्भात ७८१.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना ६०७.१ मिलीमीटर पाऊस झाला. या कालावधीत अमरावतीत ३८ टक्के, अकोल्यात ३४ टक्के, नागपुरात ३१ टक्के आणि वाशिममध्ये २९ टक्के तूट आहे. चंद्रपूरमध्ये २८, वर्ध्यात २२ आणि गडचिरोलीत १९ टक्के तूट नोंदली गेली आहे. दुसरीकडे, गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हंगामातील तूट अनुक्रमे केवळ दोन आणि आठ टक्के आहे.
सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे
विशेष म्हणजे, तीन महिन्यांची तूट २२ टक्के असली तरी ऑगस्टमधील ५८ टक्क्यांची तूट त्यापेक्षा खूप मोठी आहे. त्यामुळे ऑगस्टमधील पावसाने हंगामाच्या एकूण चित्रावर परिणाम केला आहे. आता सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस झाल्यास ही तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. मात्र, सप्टेंबरच्या पावसाचे प्रमाण आणि वितरण यावर विदर्भातील यंदाच्या पावसाळ्याचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
