नागपूर : सप्टेंबरच्या सुरुवातीला विदर्भात पावसाची शक्यता कायम असली तरी संपूर्ण महिन्याचा अंदाज या भागासाठी फारसा दिलासादायक नाही. विदर्भाच्या उत्तरेकडील भागात सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा किंचित अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून, उर्वरित विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने सप्टेंबरमधील पावसाचे वितरण महत्त्वाचे ठरणार आहे.
आयएमडीचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने ३१ ऑगस्टला सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामान अंदाज जाहीर केला. देशभरात सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरची देशाची दीर्घकालीन पर्जन्यमान सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. मात्र, देशातील सर्वच भागांत पाऊस कमी राहणार नसून काही भागांत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
सुरुवातीला पावसाच्या सरी
विदर्भासाठी सध्याचा अल्पकालीन अंदाज काहीसा दिलासादायक आहे. २ ते ५ सप्टेंबरदरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. २ आणि ४ सप्टेंबरला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची, तर ३ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. मात्र, हा अल्पकालीन अंदाज आणि संपूर्ण महिन्याचा अंदाज वेगळा आहे. पुढील चार आठवड्यांचा विचार करता विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पाऊस सामान्य किंवा किंचित अधिक राहू शकतो; इतर भागांत मात्र तूट राहण्याची शक्यता आहे.
पाऊस कमी, तर तापमान अधिक
सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहण्याबरोबरच देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचेही प्रादेशिक अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
सप्टेंबर हा नैऋत्य मोसमी पावसाचा अखेरचा महिना असल्याने या काळातील पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी तसेच जमिनीतील ओलावा आणि जलसाठ्यांसाठी महत्त्वाचा असतो. ऑगस्टमध्ये राज्यात पावसाची मोठी तूट नोंदली गेल्यानंतर सप्टेंबरमधील पाऊसही कमी राहिल्यास विदर्भातील शेतीसमोरचे आव्हान वाढू शकते. देशातील पावसाच्या या स्थितीमागे एल निनोची तीव्र होत असलेली स्थितीही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, आगामी काळात एल निनो आणखी तीव्र होऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस आणि तापमानाची स्थिती कशी राहते, याकडे हवामान विभागाबरोबरच शेती क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.
