अकोला : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आज अकोला व खामगावच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात अजित पवार यांच्या ताफ्यातील एक मोटार रुग्णवाहिकेला धडकल्याची घटना अकोल्यात घडली. या दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खामगाव येथे राष्ट्रवादीचा सोहळा व पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी, अजित पवार यांनी अकोला व वाशीम या दोन जिल्ह्यांचा आढावा अकोल्यात घेतला. आज सकाळी अजित पवार यांचे अकोल्यातील शिवणी विमानतळावर आगमन झाले. यावेळी आ. रणधीर सावरकर, आ. अमोल मिटकरी, आ. संजय खोडके, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरण सरनाईक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आदींनी स्वागत केले.
विमानतळाकडून ताफा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना एका रुग्णवाहिकेने ताफ्यातील मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात घडतात एकच गोंधळ उडाला. ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकाही पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात घडला त्या जागेपासून हाकेच्या अंतरावरच माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. त्यानंतर आज पुन्हा त्याच परिसरात अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्यामुळे बिडकर यांच्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादीचा संघटनात्मक आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पश्चिम विदर्भातील अकोला आणि खामगाव येथे दौरा सुरू आहे. खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा व राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा खामगाव येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला येथे देखील पक्षाचा संघटनात्मक आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याची निर्देश दिले. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अजित पवार यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.