नागपूर : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली उघडीप आणि पावसातील तुटीमुळे चिंतेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असल्याने पूर्व विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज, ३ सप्टेंबर रोजी गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
गोंदिया-अमरावतीला ऑरेंज अलर्ट
आज विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पूर्व विदर्भावर कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव
गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या लगतच्या भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय मध्यप्रदेश आणि परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून मध्य प्रदेशमार्गे कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने विदर्भातील हवामानावर त्याचा परिणाम होत आहे.
विदर्भात पावसाची २२ टक्के तूट
यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाला पावसाच्या तुटीचा सामना करावा लागत आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण विदर्भात २२ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांपर्यंत असल्याचे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
दरम्यान, सप्टेंबर महिन्यासाठी हवामान विभागाचा अंदाज विदर्भासाठी फारसा दिलासादायक नाही. विदर्भातील बहुतांश भागांत सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या लगतच्या काही भागांत मात्र तुलनेने चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसाचे शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्व आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
मॉन्सूनचे प्रवाह काही प्रमाणात कमकुवत झाले असले तरी मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील पावसाच्या स्थितीकडे हवामान विभागाचे लक्ष आहे.सप्टेंबरच्या सुरुवातीला मिळणाऱ्या या पावसामुळे खरीप पिकांना कितपत आधार मिळतो आणि विदर्भातील पावसाची तूट किती भरून निघते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
