नागपूर : उन्हाळय़ामुळे राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच वीजनिर्मिती आणि मागणीतील तफावतही वाढली आहे. त्यामुळे विदर्भातील वीजहानी जास्त असलेल्या १९१ ‘फिडर’वर भारनियमन सुरू झाले आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक १०१ फिडरचा त्यात समावेश आहे.

विजेची वाढती मागणी व कोळशाच्या तुटवडय़ामुळे राज्यात सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी महावितरणकडून जास्त वीजहानी असलेल्या जी-१, जी-२, जी-३ या गटात गरजेनुसार तात्पुरते भारनियमन सुरू आहे. यामुळे ऐन उन्हाळय़ात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले भारनियमन पुन्हा सुरू झाल्यामुळे नागरिकांचा महावितरणवर रोष वाढत आहे. विजेची मागणी वाढत असताना ऊर्जा खाते काय नियोजन करत होते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विदर्भात सध्या १,३३६ फिडरच्या मदतीने वीजपुरवठा केला जात आहे. यापैकी १९१ फिडर हे जी १ ते जी ३ पर्यंतच्या वर्गात असल्याने तेथे भारनियमन सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर काहींनी, विजेची उपलब्धता वाढल्यास भारनियमन बंद होईल, असा दावा केला.

जी १ ते जी ३ वर्गातील फिडरची वीजहानी

महावितरणने वीज चोरीचे प्रमाण आणि देयकाच्या वसुलीनुसार फिडरचे वेगवेगळे गट निश्चित केले आहेत. त्यानुसार जास्त चोरी व देयक वसुली कमी असलेल्या भागात भारनियमनाचा निर्णय झाला आहे. जी-१ भागात वाणिज्यिक व वितरण हानीचे प्रमाण ५८ ते ६६ टक्के,

जी-२ भागात प्रमाण ६६ ते ७४ टक्के, जी- ३ भागात प्रमाण ७४ पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या फिडरवर भारनियमन सुरू आहे.

परिमंडळनिहाय फिडरची स्थिती

परिमंडळ       एकूण फिडर  भारनियमन

नागपूर           १९९        १०

अकोला          ४००        १०१

अमरावती         ३३७        ६९

चंद्रपूर           २०४        ६

गोंदिया          १९६          ५