अमरावती : पर्यावरणासाठी धोका ठरणाऱ्या टाकाऊ प्लास्टिकच्या समस्येवर विदर्भातील संशोधकांनी प्रभावी व पर्यावरणपूरक तोडगा शोधून काढला आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. विजया संगावार आणि आर्वी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. गणेश येरावार यांनी विकसित केलेल्या ‘डिझाइन ऑफ प्लास्टिक वेस्ट फायबर मेकिंग मशिन’ या तंत्रज्ञानाला भारत सरकारकडून अधिकृत ‘डिझाइन पेटंट’ मंजूर झाले आहे. नुकतीच या पेटंटवर केंद्र सरकारची मोहोर उमटली.

यंत्र पूर्णपणे प्रदूषणमुक्त

डॉ. विजया संगावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गणेश येरावार यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले आहे. विकसित करण्यात आलेली ही ‘फायबर मेकिंग मशीन’ पूर्णपणे प्रदूषणमुक्त आहे. दैनंदिन वापरातील जवळपास सर्व प्रकारच्या टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर (रिसायकलिंग) या यंत्राद्वारे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या घातक रसायनांचा वापर करावा लागत नाही. अतिशय कमी ऊर्जा आणि अत्यल्प खर्चात टाकाऊ प्लास्टिकवर प्रक्रिया करून औद्योगिक वापरासाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे फायबर्स (धागे) तयार करता येतात.

भविष्यातील संधींची नवी कवाडे खुली

या यंत्राद्वारे तयार होणारे धागे उद्योग क्षेत्रातील विविध उत्पादनांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे लघुउद्योजक, स्टार्टअप्स आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा नवा व स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच औद्योगिक संधींची नवी कवाडे या संशोधनामुळे खुली झाली असून, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने हे तंत्रज्ञान क्रांतिकारी पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

संशोधकांचे विविध स्तरातून अभिनंदन

संशोधन क्षेत्रात सातत्य राखणाऱ्या डॉ. विजया संगावार यांच्या नावावर नोंदवले गेलेले हे पाचवे पेटंट आहे, तर प्रा. गणेश येरावार यांचे हे दुसरे पेटंट ठरले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण, पर्यावरण आणि विज्ञान वर्तुळातून दोन्ही संशोधकांवर कौतकाचा वर्षाव होत आहे.

पॉलिथिनच्या पिशव्यांचा प्रश्न

पॉलिथिनच्या पिशव्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना डॉ. विजया संगावर यांनी यावर उपाय शोधला आहे. त्याद्वारे १८० दिवसांत पॉलिथिनच्या कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पॉलिथिनच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न त्यामुळे सुटणार ओ. या संशोधनाचे पेटंट देखील त्यांना मिळाले आहे. विजया संगावार यांना २०१८ मध्ये पहिले पेटंट मिळाले होते.