विदर्भ साहित्य संघाच्या धुरिणांचे खरे रूप दिसायला आता सुरुवात झाली आहे. मालकीच्या वास्तूतून भाड्याच्या घरात जाणे, सुरू असलेले उपक्रम बंद करणे, हे या रूपाचे द्योतक. अलीकडे आम्ही काहीतरी भव्यदिव्य करतो असे सांगून आहे ती व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रकार रुजलेला. सत्ताधारी तर यालाच चटावलेले. नवी व्यवस्था उभी करणे म्हणजे कंत्राटदार आले. यात कुणाचा फायदा होतो हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. दुर्दैव हे की साहित्य क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी असलेल्या संघाला सुद्धा याची लागण झालीय. या नव्या संघाचे भव्यदिव्य ध्येय काय तर नवीन इमारत उभारणे. तीही ३२ मजली. अशी देखणी वास्तू उभी ठाकली म्हणजे विदर्भातील तमाम लेखकांना नव्या शब्दकळा सुचू लागतील असा समज कदाचित संघाच्या धुरिणांचा असावा.

अगदी अलीकडे याच संघाकडून देणगी मागण्याचा कार्यक्रम राबवला गेला. संघाच्या १०४ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले. गेल्या शंभर वर्षात या संस्थेवर आर्थिक अडचणीचे कितीतरी प्रसंग आले. अनेकदा पैसे नाहीत म्हणून कार्यक्रम टाळले गेले. मात्र कुणाच्याही कार्यकाळात असा भीक मागण्याचा प्रकार घडला नाही. जेव्हा कधी अशी बिकट स्थिती उद्भवली तेव्हा कार्यकारिणीतील लोकांनी स्वत:च्या खिशातले पैसे टाकले. संघाविषयी सहानुभूती बाळगून असलेल्या लोकांनी फार गाजावाजा न करता लाख लाख रुपये दिले. मग नव्या धुरिणांना अचानक हाती कटोरा घेण्याची गरज का पडावी? निवडणुकीच्या काळात तर हेच लोक आमच्या पाठीशी सत्तेतील ‘वजनदार’ नेते आहेत. ते आता संघाच्या इमारतीचा पूर्णपणे कायापालट करणार. त्यासाठी सरकार मदत करणार अशा गमजा मारत होते. त्याचे काय झाले? वजनदार पुढाऱ्याने हात काढून घेतला की सरकारने मदतीला नकार दिला? नक्की काय घडले? याचे उत्तर न देताच लोकांकडून पैसे गोळा करणे पारदर्शकतेच्या कोणत्या व्याख्येत बसते? संघाकडे राज्य सरकारने दिलेले दहा कोटी रुपये पडून आहेत. त्यावर नियमितपणे व्याजही मिळते. त्यातून संघाचे दैनंदिन कामकाज चालत नाही काय? असेल तर सामान्यांसमोर झोळी का पसरता? संघाची आता उभी असलेली वास्तू इतकी जर्जर झालेली आहे का? की त्यातून लगेच बाहेर पडावे असे धुरिणांना वाटते? मुळात अशी उभी असलेली वास्तू पाडणे व त्या ठिकाणी नवी उभारणे हे साहित्यविषयक उपक्रमासाठी जन्माला आलेल्या संघाचे प्रमुख ध्येय कसे असू शकते? ही वास्तू पाडण्याची इतकी घाई कशासाठी? यातून कुणाचा फायदा होणार? संघाचा की वास्तू उभारणीत रस असलेल्यांचा? या सर्व प्रश्नांचे उत्तर होय असेल तर त्यासाठी सामान्यांच्या खिशाला खार कशासाठी? लोकवर्गणीचे नाटक उभे करून नेमके कुणाचे हित साधायचे आहे? जवळजवळ ११ कोटी रुपयाची रोख गंगाजळी असलेल्या या संस्थेची आर्थिक स्थिती खराब आहे असे हे धुरीण कसे म्हणू शकतात? एवढाच नव्या इमारतीचा सोस असेल तर स्वत:ची घरेदारे विका व उभी करा नवी वास्तू. सामान्यांना मूर्ख बनवण्याची गरज काय?

संस्था चालवणाऱ्या जुन्या धुरिणांनी खूप चुका केल्या. वाईट संकुल बांधून ठेवले. या चुका दुरुस्त करण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे असा या नव्या धुरिणांचा दावा. त्यात तथ्य असेल तर आधीच्यांनी नेमक्या कोणत्या चुका केल्या? तद्दन भिकार इमारत कशी उभी राहिली? त्याला जबाबदार कोण हे जाहीर करण्याचे काम नव्या धुरिणांचे. ते का पार पाडले जात नाही? त्यासाठी कुणी अडवून ठेवले आहे का? सार्वजनिक संस्थांनी लोकांसमोर हात पसरण्याच्या आधी सर्व वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे कर्तव्य ठरते. ते न पार पाडताच थेट भीक मागायला सुरुवात करणे संशय निर्माण करणारे. हे नव्या धुरिणांना मान्य आहे का? लोकांसमोर झोळी पसरवणे याचा एक अर्थ संस्था नीट चालवता येत नाही असाही निघतो. तो आता मान्य करायचा का? केवळ एका संकुलामुळे जर संस्था अडचणीत आली असेल तर त्याला जबाबदार कोण याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. ही सर्व माहिती जनतेसमोर खुली केली पाहिजे. मगच लोकांसमोर पदर पसरला पाहिजे. यातले काहीच न करता हे देणगीचे आवाहन का केले जात आहे? यातून नेमके कुणाचे दोष लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे? खऱ्या दोषीला दडवून ठेवायचे व अडचणीचा पाढा वाचायचा हा ढोंगीपणा झाला. तो कशासाठी केला जात आहे? नव्या धुरिणांमधील अनेकजण स्वच्छ चारित्र्याचा आव आणतात. आमचे सार्वजनिक जीवन कसे बेदाग आहे असे सतत उच्चरवात सांगत असतात. मग तसे वागत का नाहीत? या नव्या धुरिणांना सहा महिने होत आले. या काळात संघात साहित्यविषयक उपक्रम नेमके किती झाले? माझ्या कविता तू ऐक व तुझ्या मी ऐकतो या छापाचे सोडून. एकही नाही हे त्याचे उत्तर. मग हे लोक नेमके करतात तरी काय? जुने पाडणे व नवे बांधणे हा एकमेव ध्यास कसा असू शकतो? हे लोक व्यापारी आहेत की साहित्याविषयी आस्था असलेले? नवे संकुल उभारायला किमान दहा वर्षे तरी लागतील. तोवर सारे साहित्यविषयक उपक्रम बंद राहतील असे तरी या धुरिणांनी जाहीर करून टाकावे. तसेही आजकाल या संघात जेवढे कार्यक्रम होत नाहीत तेवढे बाहेर होतात. त्यातून या शहराची सांस्कृतिक भूक भागते. हे बाहेर होणारे कार्यक्रम संघात किरकोळीत होणाऱ्या कार्यक्रमांपेक्षा कितीतरी दर्जेदार असतात. याचे या धुरिणांना जराही शल्य वाटत नसेल का? समोरच्याच हिंदी साहित्य संघाचे उदाहरण पुरेसे बोलके. तिथे कायम वर्दळ असते. या संघाच्या अंत:स्थ वर्तुळातून केवळ वैचारिकतेमुळे बाहेर फेकल्या गेलेल्या अनेक संस्था हिंदी साहित्य संघाचा आधार घेतात. नव्या धुरिणांना हे आपल्यासाठी लांछनास्पद आहे असे वाटत नसेल का? केवळ नवी इमारत बांधण्यासाठी या साऱ्यांना मतदारांनी निवडून दिले आहे का? तसे असेल तर आजही स्पष्टपणे जाहीर कबुली देऊन मोकळे होणे केव्हाही उत्तम. तशी धमक या नव्यांमध्ये आहे का? नसेल तर मग ताकाला जाऊन भांडे कशाला लपवता? संस्था चालवणारे कुणीही असोत, त्यांचे वर्तन व वृत्ती संशयातीत असली पाहिजे. जे अडचणीचे आहे त्याची वाच्यता करायची नाही व लोकांसमोर हात पसरण्याचे नाटक करायचे हा दुटप्पीपणा झाला. तोच या संघात घडताना दिसतो आहे. साहित्यविषयक उपक्रम तर दूरच राहिले.