आधुनिक काळातील भारतीय तत्त्वचिंतनाच्या परंपरेत महात्मा गांधी यांचे स्थान फार वरचे. गांधीजींच्या मते, साध्य आणि साधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. साधने पवित्र असतील, तरच साध्य पवित्र स्वरूपात प्राप्त होते, असे ते म्हणायचे. चुकीच्या मार्गाने (वाईट साधने वापरून) कधीही चांगले फळ (साध्य) मिळू शकत नाही, असे ते सांगत. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भाचे सांस्कृतिक नेते गिरीश गांधी उभे आहेत. त्यांच्या आडनावात ‘गांधी’ आहे. ते स्वतःही गांधीवादी असल्याचा दावा करतात. परंतु, ज्या पद्धतीने विदर्भ साहित्य संघाची निवडणूक त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलतर्फे लढवली जातेय, तिला अनैतिक मार्गांच्या अवलंबाचा कलंक लागलेला आहे. त्यांच्या पाठीशी भाजपची पूर्ण यंत्रणा उभी आहे. एकूण चार पॅनेल्समध्ये ही निवडणूक होत आहे. त्यापैकी दाते विद्यमान अध्यक्ष तर शोभणे व जोशी हे मान्यताप्राप्त साहित्यिक. डॉ. गांधी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात फार मोठे नाव आहे यात वाद नाही. परंतु, लौकिक अर्थाने ते साहित्यिक नाहीत. तरीही ते निवडणुकीत उतरले किंवा त्यांना भरीस पाडले गेले असावे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपल्या संस्थांचा कार्यभार पुढच्या पिढ्यांकडे सोपवण्याचा विचार त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवला. एकीकडे संस्थात्मक कार्यातून दूर होण्याची मनीषा व्यक्त करायची आणि त्याचवेळी विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत मात्र थेट अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची, ही वर्तन विसंगती त्यांच्या लक्षात येत नसेल का? ते साहित्यिक नसले तरी त्यांना विदर्भ साहित्य संघाची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, हे मान्य. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक टपालाने पाठवलेल्या मतपत्रिकेवर होते. आधुनिक काळात ही पद्धत चुकीची. परंतु, ती सर्व उमेदवारांनी मान्य केलेली. त्यामुळे त्यावरही आक्षेप घेण्याचे कारण नाही. अधिकाधिक मतदारांच्या मतपत्रिका, त्यांच्यापर्यंत व्यक्तिगत पोहोचून किंवा आपल्या प्रतिनिधींना संपर्क करण्यास सांगून गोळा करायच्या आणि त्या निवडणूक प्रक्रिया सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुपूर्द करायच्या हीच पद्धत आजवर होती. आताही तीच आहे. डॉ. गांधी यांचे पॅनेल मात्र राजकीय पक्षाच्या संपर्क सूत्रांचा वापर करून मतपत्रिका गोळा करीत आहे. टपाल खात्यातून परस्पर मतपत्रिका लांबवून मतदान केले जात असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. हे अनैतिक. त्यांच्या पॅनेलमधील एका उमेदवाराने एका ज्येष्ठ लेखकाची मतपत्रिका त्यांच्या परवानगीविना निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केली, हे तर त्याहून अधिक अनैतिक. गडचिरोलीत तर टपाल खात्याशी संधान साधून परस्पर मतपत्रिका पळवण्यात आल्या अशी तक्रार खुद्द मतदारांनीच निवडणूक अधिकाऱ्याकडे व पोलीस ठाण्यात केली आहे.

डॉ. गांधी यांच्याकडे सारेच आदराने व आत्मीयतेने पाहतात. होतकरू व गुणवंतांचा सत्कार करणे, विविध प्रकारचे पुरस्कार देणे, चर्चा-परिसंवाद-प्रकाशने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. किंबहुना, त्यांचे विरोधकही खाजगीत असे म्हणतात की, फक्त गिरीशभाऊ आहेत म्हणून अशाप्रकारचे कार्यक्रम नागपूर व विदर्भात होत असतात. गांधींचा एकूण संस्थात्मक प्रवास पाहिला तर असे लक्षात येते की, त्यांनी संस्था नीट सांभाळल्या आणि वाढवल्या. संस्था ताब्यात घेण्यासाठी किंवा त्या वाढवण्यासाठी त्यांनी एकमत वा सहमत घडवून आणले असेल. पण, अनैतिक मार्गांचा अवलंब कधीही केला नाही. वनराई, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, मारवाडी फाऊंडेशन अशा अनेक संस्था गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. त्या संस्थांतील सारेच त्यांच्या मताशी सदैव सहमत असतील, असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. परंतु, एक नक्की सांगता येते की, व्यापक स्वरूपाच्या एकमतासह गिरीशभाऊंच्या संस्थांचा कारभार चालतो. ही परंपरा लक्षात घेतली तर विदर्भ साहित्य संघ ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलकडून ज्या काही अनैतिक मार्गांचा अवलंब केला जातोय, त्याचे अनेकांना दुःख झाले आहे. यात त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतोय तो वेगळाच. विदर्भ साहित्य संघ ही संस्था कितीही मोठी असली तरी गिरीशभाऊंचे संस्थात्मक कार्य त्याहून फार मोठे. त्यामुळे अशा संस्थेसाठी त्यांनी स्वत:च्या जीवनमूल्यांशी तडजोड स्वीकारणे त्यांच्याच चाहत्यांना पटेनासे झालेले आहे. हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? की त्यांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणे सुरू केले आहे.

निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढवली जाते. राजकारण राजकारणासारखेच केले पाहिजे. विदर्भ साहित्य संघ आणि राजकीय लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुका यांतील फरक असा की, साहित्य संस्थेच्या निवडणुकीत किमान नैतिकतेचे आचरण अपेक्षित असते. आता समाजाची राजकारण्यांकडून नैतिकतेची अपेक्षा नाही. राजकारण्यांनी त्यांच्या अनैतिक व्यवहारांनी साहित्य-संस्कृतीशी संबंधित संस्थांचे व्यवहार दूषित करू नयेत, एवढाच साहित्यप्रेमींचा आग्रह आहे आणि त्यामुळेच गिरीशभाऊंना निवडून आणण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय हडेलहप्पीला विरोध सुरू आहे. निवडणुकीत जय-पराजय होणार. १५ मार्चचे घोडामैदान जवळ आहे. चारच उमेदवारांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस आहे. त्यात गिरीशभाऊ हे आघाडीचे उमेदवार आहेत, यात वाद नाही. यदाकदाचित ते विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी निवडून आले तर त्यांचा तो विजय नैतिक असणार नाही. कारण त्यांचे साध्य म्हणजे वि.सा. संघाचे अध्यक्षपद हे त्यांना मिळणार असले तरी त्यासाठी वापरलेली साधने पवित्र नाहीत. त्यामुळे त्यांचा विजय हा पूर्णपणे अनैतिक स्वरूपाचा ठरणार आहे. इतर कुणी उमेदवार भाऊंच्या पॅनेलच्या पद्धतीने निवडणूक लढवत असेल तर त्यांचाही विजय अनैतिकच असेल. शेवटी साहित्य संस्था या समाजाच्या दिग्दर्शक असतात. राजकारणाला चांगल्या-वाईटाचे त्यांना घेणेदेणे नसते.

राजकारणात सत्ताकारण सर्वांत महत्त्वाचे. सत्ताधीश होणे हेच प्रत्येकाचे ध्येय असते. भाऊंसारख्यांच्या विजयाने साहित्य संस्थांमध्येही तसे वातावरण निर्माण झाले तर त्याचे अपश्रेय ते स्वीकारणार आहेत काय? निवडणुका होत राहतील. कुणीही निवडून आले तरी त्या पदाचा अमरपट्टा कुणालाच मिळणार नाही. परंतु, संस्थेचे वातावरण नेहमीसाठी खराब होईल आणि त्याचा कलंक गिरीशभाऊंच्या माथी नेहमीसाठी चिकटलेला राहील. यापूर्वी विदर्भ साहित्य संघात राजकारण झाले नाही असे नव्हे. परंतु, ते इतक्या आक्रमक आणि अनैतिक पद्धतीने झाले नाही. प्रथमच विदर्भ साहित्य संघाची निवडणूक इतक्या चुरशीने लढवली जातेय. लोकशाहीच्या दृष्टीने ही चुरस चांगली आहे. त्यामुळे अनेक विषयांवर मंथन-चिंतन होत आहे. फक्त या निवडणुकीत होत असलेला अनैतिक मार्गांचा अवलंब हाच आक्षेपाचा मुद्दा. ही निवडणूक अशा अनैतिक मार्गांनी जिंकलो तरी विजयाचे हे फलित ‘अनैतिक’ आहे, हे गांधींना मान्य असेल काय? आणि असलेच तर त्याचा स्वीकार मी केला असे जाहीरपणे म्हणण्याची हिंमत ते नंतर दाखवतील काय? हा प्रश्न याचसाठी की ते ‘गांधी’ आहेत म्हणून.