नागपूर : मुंबई, पुण्यापाठोपाठ आता विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतही भाजपवर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप प्रतिस्पर्धी पॅनलने केला आहे. भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी विदर्भातील मंत्री व आमदारांना गिरीश गांधी यांच्या पॅनलसाठी टपाली मतपत्रिका गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा दावा अक्षरमैत्री पॅनलने केला आहे. दरम्यान, कोठेकर यांनी हे आरोप नाकारले आहेत.
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या नव्या कार्यकारिणीसाठी यंदा प्रथमच निवडणूक होत आहे. आजवर बिनविरोधची परंपरा लाभलेल्या या संघावर नियंत्रण मिळवण्यासाठी चार पॅनल रिंगणात उतरले आहेत. अध्यक्ष प्रदीप दाते व डॉ. पिनाक दंदे यांचे अक्षरमैत्री हे त्यापैकी एक आहे.
वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी, कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचे पॅनल रिंगणात आहे. यापैकी गांधींच्या पॅनलला मतदान होईल याकडे लक्ष पुरवा असे निर्देश कोठेकर यांनी दिल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
रिंगणात असलेल्या चारही पॅनलमध्ये विविध राजकीय भूमिका असलेले व वेगवेगळ्या विचारधारांचे उमेदवार असताना भाजपकडून गिरीश गांधी यांच्यासाठीच कसा काय प्रचार करू शकतो, असा प्रश्न अक्षरमैत्रीकडून उपस्थित करण्यात आला आहे. अशा पद्धतीने मतदारांवर राजकीय दबाव आणणे पूर्णपणे गैर आहे. विदर्भ साहित्य संघ पूर्णपणे अराजकीय संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या व्यासपीठावर सर्वच विचारधारांचा सन्मान केला जातो. या पार्श्वभूमीवर आयुष्यभर भाजपवर टीका करणार्या व स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणार्या गिरीश गांधींच्या पाठीशी भाजप कसा काय उभा राहू शकतो? ही वैचारिक जोखीम घ्यायला हा पक्ष कसा काय तयार झाला याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. भाजपने गांधींच्या पाठीशी उभे राहण्यामागे काही वेगळी कारणे व हितसंबंध आहेत का असा सवाल या पत्रकातून उपस्थित करण्यात आला आहे. यावर प्रदीप दाते, विलास मानेकर व डॉ. पिनाक दंदे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
गांधी, संघ अन् गडकरी
या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निवडणुकीत लक्ष घालावे अशी मागणी गिरीश गांधींनी केली होती. त्यावरून गदारोळ झाल्यावर गडकरींनी पत्रक काढून या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले होते. संघाची आताची इमारत पाडून तिथे नवे संकुल उभारले जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. आता त्यांच्याच वर्तुळातील कोठेकरांनी घेतलेला पुढाकार व आज त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे हा राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेला आला आहे. या पत्रकानंतर गिरीश गांधींशी संपर्क साधला असता निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
विदर्भ साहित्य संघाचा मी सदस्य आहे. निवडणुकीमध्ये काही मित्र रिंगणात आहेत. ही बाब सोडली तर साहित्य संघाच्या निवडणुकीशी किंवा प्रचाराशी कुठलाही संबंध नाही. मतपत्रिका गोळा करण्यासाठी भाजपच्या आमदारांना संपर्क केला ही केवळ ऐकीव माहिती आहे. यात काहीही तथ्य नाही. – डॉ. उपेंद्र कोठेकर, विदर्भ संघटन मंत्री, भाजप.

