वर्धा, विदर्भ साहित्य संघाची निवडणूक लागली हे जगासमोर आले ते एका महत्वाच्या केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने. हे मान्यवर मंत्री म्हणजे नितीन गडकरी. माझा संबंध नसल्याचा त्यांचा खुलासा आला आणि निवडणूक चर्चेत आली. पुढे विविध वादंग पण चर्चेत आले. मात्र ही निवडणूक अधिक रंगात आली ती विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते व त्यांचे मित्र संजय इंगळे तिगावकर यांनी लोकसत्तास दिलेल्या स्फ़ोटक माहितीने, असे मतदार बोलू लागले आहेत.
आता या लोकसत्ता ऑनलाईन बातमीचे चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. अनेकांच्या प्रतिक्रिया येणे सूरू झाले आहे. त्यातच एक मतदार म्हणतो की मी या संस्थेचा मतदार आहे, हे आजच मला समजले. विविध शासकीय पुरस्कार तसेच सामाजिक पुरस्कार लाभलेले प्रा. नवनीत देशमूख म्हणतात की आज प्रथमच मी मतदार असल्याचे कळले. म्हणून ४५ वर्षांपासून माझ्या नावे कोण मतदान करीत होते, ते कळले पाहिजे. मतदार यादीत माझे नाव ५५ क्रमांकावर आहे, हे समजले. संघाची आजन्म सभासद यादी आजपर्यंत कधीच पाहायला मिळाली नाही. आता प्रथमच मतदान योग येतोय. आमच्या नावे कोण मतदान आजवर करीत होते, ते कळले नाही, ही खंत.
प्रा. नवनीत देशमुख पुढे आणखी स्पष्ट होतात. ते सांगतात की वर्धेत ७९ -८० सालात मी जा़ ब़ विज्ञान महाविद्यालयात आणि किशोर सानप जी एस़ काॅमर्स काॅलेजला रुजू झालो आणि वाड्मयीन हालचाली सुरू केल्या. विदर्भ साहित्य संघाची तेव्हा वर्धेत शाखा होती. पण ती आमच्यापासुन दूर होती. किशोर सानपने त्यात प्राण फुंकले. तेव्हा मी आजन्म सभासद झालो. पण विसासंघाच्या नागपूरच्या बैठकीत मिटिंगला वगैरे चुकूनही बोलवल्या नाही गेलं नाही. विसासंघाचा महोत्सव झाला त्यानिमित्ताने कथा स्पर्धा आयोजित केली होती. त्यास्पर्धेत शापीत ही माझी कथा पहिली आली होती.
मला वाटतं तो विसासंघाचा हिरण्य महोत्सव होता. विसासंघाने कधी आपलं मानलं नाही. आता दाते अध्यक्ष झाले होते वाटलं वर्धेतला आपला माणूस आहे . पण दातेसाहेबांनी तर कमालच केली. २१००रूपये अ़भा साहित्य संमेलनासाठी भरले. साधी निमंत्रण पत्रिकाही मिळाली नाही. सहभाग दूरची गोष्ट. साहित्य संमेलनाचं उद्दीष्ट असतं स्थानिक भागातील कलावंत यानिमित्ताने समोर आणायचे. मी तर वर्धेत झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनाची वरददायिनी ही स्मरणिका संपादित केली होती. तरीही नागपूरच्या साहित्यिकांनी कधी दखलही घेतली नाही.
एखादी संस्था चालवतांना प्रादेशिक समतोल राखावा लागतो. राम शेवाळकर, वामन तेलंग, प्रभाकरसिरास या लोकांनी मात्र राखून कार्य केले.दातेसाहेब आल्यावर वाटलं होतं निदान हे तरी आता चांगलं कार्य करतील. असे झाले नाही. साहित्य, वाङ् मय ज्याला कळते अशी व्यक्तीच विसासंघाची अध्यक्ष व्हायला हवी आणि या निवडणूका वगैरे अजिबात नको.
मागील चार पाच वर्षातून आपण बघतो आहोत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ,विकासासाठी मराभाषेचं स्वतंत्र विद्यापिठ व्हावं या साठी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अतिशय कळकळीने कष्ट घेतलेत. कितीतरी व्हिडिओ कितीतरी लेख मुख्यमंत्र्यांना वारंवार दिलेत. यासारखे मराठी भाषेबद्दल ते कळकळीने कार्य करीत आले. खरं म्हणजे जोशींना बिनविरोध सन्मानाने विसासंघाच अध्यक्षपद द्यायला हवं. आणखी काय माझे दुःख सांगू. अशी हताशता प्रा. देशमुख लेखी स्वरूपात व्यक्त करतात.

