गडचिरोली : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेला बोगस मतदानाचे गालबोट लागले असून, गडचिरोली जिल्ह्यात दररोज धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आरमोरी येथे मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहोचण्यापूर्वीच त्या परस्पर पळवून मतदान उरकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप डॉ. महेश कोपुलवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत मृत व्यक्ती आणि गाव सोडून गेलेल्या मतदारांची नावेही असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या मतचोरीने साहित्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रार केल्यानंतरही ‘परस्पर’ मतदान

आरमोरी येथील डॉ. महेश कोपुलवार, विजयकुमार ठवरे, सुधीर भातकुलकर आणि स्वाती भातकुलकर या चार सभासदांनी आपल्याला मतपत्रिका मिळाल्या नसल्याची तक्रार शनिवारी केली होती. १०-१२ दिवस उलटूनही स्पीड पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिका न मिळाल्याने त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. मात्र, सोमवारी या चारही सभासदांच्या नावे परस्पर मतदान झाल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाली. ज्या मतदारांनी स्वतः तक्रार केली होती, त्यांच्याच नावे कुणीतरी मतदान केल्याचा आरोप आहे.

पोस्टातील मतपत्रिकांची परस्पर उचल

डॉ. कोपुलवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, एका बँकेत कार्यरत दहिकर नावाच्या व्यक्तीने पोस्ट ऑफिसमधून तब्बल १० मतपत्रिका अनधिकृतपणे स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या मतपत्रिका एका नाट्य परिषदेशी संबंधित पदाधिकाऱ्यामार्फत विशिष्ट कार्यालयात पोहोचवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृत आणि स्थलांतरितही ‘मतदार’

या मतचोरीची व्याप्ती केवळ मतपत्रिका पळवण्यापुरती मर्यादित नसून शालिनी गेडाम या महिला मतदाराचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावे मतपत्रिकेचा वापर करून मतदान करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. नारायण फटिंग हे अनेक वर्षांपासून गाव सोडून वर्ध्यात स्थायिक आहेत, मात्र त्यांच्याही नावे मतदान नोंदवले गेले आहे. डॉ. कोपुलवार यांनी स्वतः मतदान करण्यापूर्वीच त्यांच्या नावे कुणीतरी बोगस मतदान उरकले होते. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अहेरी धानोरा आणि इतर भागातही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

कायदेशीर लढाईचा पवित्रा

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत सुरू असलेला हा प्रकार गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. आम्ही मतदान केले नसतानाही आमची मते नोंदवली गेली. हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे, असे डॉ. कोपुलवार यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास लवादाकडे सोपवण्याची आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवडणूक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

पोस्टातील स्वाक्षऱ्या आणि मतपत्रिका संकलित करण्याची पद्धत पाहता, हा एका मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात पडद्याआड सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा सक्रिय सहभाग आत लपलेला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे विदर्भातील साहित्यिकांचे लक्ष लागले आहे.