विदर्भ साहित्य संघाच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होत आला. मूल्यांशी तडजोड करून निवडून आलेले नवे अध्यक्ष गिरीश गांधी व त्यांच्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. तरीही यातील राजकारणाचे कवित्व संपायला तयार नाही. स्वत:ला पुरोगामी समजणारे गिरीश गांधी पदासाठी चटकन उजव्यांच्या मांडीवर जाऊन का बसले यावर बराच काथ्याकूट झाला. अजूनही होतोय. त्यांच्या या कृतीमुळे राज्यभरातील पुरोगाम्यांना जो धक्का बसला त्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. मात्र याच निवडणुकीच्या निमित्ताने उजव्यांच्या वर्तुळातही अनेकांना धक्के बसले. त्याची चर्चा मात्र फारशी झाली नाही. म्हणून हा प्रपंच!
सारा देश उजव्या विचारांचा करण्यासाठी केवळ राजकीय सत्ता पुरेशी नाही तर साहित्य, धर्म, देवस्थाने, समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था, संघटना यावरही ताबा मिळवायला हवा हे उजव्यांचे उद्दिष्ट. ते लपूनही राहिलेले नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यावर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विधान बरेच काही सांगून जाणारे. ‘आमच्यावर संघाचे संस्कार आहेत’ असे ते म्हणाले होते.
यावरून हे ताबा मिळवणे किती सुनियोजितपणे होते याची कल्पना येते. मग हेच नियोजन नागपुरात का दिसले नाही? संघ व भाजपच्या लोकांनी गिरीश गांधींच्या पॅनलसाठी भरभरून मते गोळा करताना इतर पॅनलमधील आपल्याच परिवारातील लोकांचा पराभव का केला? साहित्य संघाच्या मतदार यादीवर उजव्या विचारांचा वरचष्मा आहे ही बाब सूर्यप्रकाशाएवढी सत्य होती. हे आधीच ज्ञात असलेल्या या परिवाराने आपल्या विचारांच्या उमेदवारांचे एकच पॅनल हवे यावर का विचार केला नाही? हे सहज शक्य होते. तरीही गिरीश गांधींची निवड का करण्यात आली? त्यासाठी संघाला कुणा भाजपनेत्याने भाग पाडले का? तसे असेल तर सर्वशक्तिमान संघ कधीपासून भाजपनेत्यांचे ऐकायला लागला? संघातील काहींना सत्तेचे लाभार्थी होण्याची सवय लागली व त्यातून हे घडले असे आता समजायचे काय? या निवडणुकीत एकूण चार पॅनल रिंगणात होते. त्या सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष संघात काम करणारे, संघाचे समर्थक, भाजपचे समर्थक, उजव्या विचाराचे समर्थक असे अनेक महनीय होते. त्यातील अनेकांचा जिव्हारी लागेल असा पराभव झाला.
ही जखम लवकर भरून येणे शक्य नाही. मग केवळ संस्थेवर ताबा मिळावा म्हणून संघ व भाजपने आपल्याच माणसांना दुखावले त्याचे काय? या पराभूतांमध्ये अनेक नामवंत आहेत. यातले काही तर परिवाराची व त्यातल्या त्यात संघाची भूमिका अगदी हिरिरीने वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडतात. त्यांच्याविषयी परिवाराच्या वर्तुळात आताही आदराची भावना आहे. या साऱ्यांचा पराभव करून संघ व भाजपने नेमके काय साधले? साध्य मोठे, त्यासाठी वापरलेले साधन महत्त्वाचे नाही अशी संघाची भूमिका आहे का? कारण याच दोन शब्दांचा वापर संघ सातत्याने करत आलाय.
या निवडणुकीत संघ सक्रियपणे सहभागी नव्हताच वा होता असे दावे आजही केले जातात. यातले खरे काय व खोटे काय हे संघाच्या धुरिणांनाच ठाऊक. मात्र गिरीश गांधींच्या पॅनलसाठी संघ तसेच भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचे अनेकांना दिसले. मतदारांनी सुद्धा वरून आदेश आला म्हणून मतदान केले. असे निमूटपणे वागणारे मतदार हेच या परिवाराचे बलस्थान. ते ठाऊक असल्यामुळे गांधींची प्रचार यंत्रणा सांभाळणाऱ्यांनी इतर पॅनलमधली आपलीच माणसे दुखावली जातील याकडे दुर्लक्ष केले असे आता म्हणायचे काय? गांधींच्या पॅनलमध्ये आजवर उजव्या विचाराला त्याज्य मानणारे अनेक लोक होते. या साऱ्यांनी पुरोगामित्वाची शाल पांघरुण संघ व भाजपवर यथेच्छ टीका केलेली. डोळस मतदारांना ती ठाऊक नसण्याचे काही कारण नाही. त्यामुळे मतपत्रिका गोळा करताना परिवारातील लोकांना अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. त्याचे सहमतीत रूपांतर करून हे काम यशस्वीपणे पार पाडले गेले. यामुळे देशात पहिल्यांदाच असे घडले की उजव्यांच्या पाठिंब्यावर पुरोगामी निवडून आले. याचे मोठे दु:ख पराभूत उजव्यांना होणार नाही तर काय? सर्वंकष सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे व धाडसी प्रयोग करण्यात भाजप व संघ आघाडीवर असतो.
राजकीय वर्तुळात ते अनेकदा दिसते. तसाच प्रयोग साहित्य वर्तुळातही करण्यात आला असा अर्थ आता काढायचा काय? उजव्यांच्या मतांवर साहित्य संघात निवडून आलेले पुरोगामी आता परिवाराची दीक्षा घेतील, त्यांच्याकडून होणारी जहरी टीका बंद होईल, हळूहळू त्यांच्यात उजवेपण स्थिरावत जाईल अशी आशा या वर्तुळाने बाळगली आहे काय? आजकाल सत्ता व पदांसाठी कुणीही वैचारिक भूमिका त्यागायला पटकन तयार होतो. राजकारणात हे नित्याचेच. तेच आता गांधी व त्यांचे बोट धरून संघात शिरलेल्यांचे होईल काय? गांधींच्या एकदोन सहकाऱ्यांकडून तसे संकेत मिळू लागलेत. स्वत: गांधी तर वैचारिक भूमिकेवर चुप्पी साधून आहेत. समजा हे मतपरिवर्तन घडले तर तो उजव्यांचा मोठा विजय असेल. तरीही प्रश्न उरतो तो पराभूतांचे काय? त्यांना कोणत्या पापाची शिक्षा परिवाराने दिली? कदाचित हे संघ व भाजपच्या लक्षात आले असावे म्हणूनच पराभूत झालेल्या माजी सरचिटणीसांना पुन्हा तेच पद बहाल करण्यात आले. मग इतरांचे काय? त्यांना आधीच पुरेशी कल्पना दिली असती तर ते बिचारे रिंगणातच उतरले नसते. परिवाराने आधीच सर्वांचे मत विचारात घेऊन स्वतंत्र पॅनल तयार केले असते तर या सर्वांवर असा अनावस्था प्रसंग ओढवला नसता.
संघ व भाजपचा आपल्याच विचारांच्या मतदारांवर फार विश्वास नव्हता. ते काय करतील याचा अंदाज नव्हता. म्हणून ही गांधी-मुखवट्याची खेळी खेळली गेली असेल काय? जिथे अशक्य आहे तिथे सत्ता मिळवण्यासाठी असे प्रयोग हा परिवार राजकारणात करत आलाय. एकदा ती मिळाली की नंतर जे बाहेरचे आहेत त्यांना हळूच दूर सारले जाते. गांधी व त्यांच्या वैचारिक सहकाऱ्यांच्या बाबतीत हे नक्की घडेल ही सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ बाब. परिवाराला सक्षम करण्याच्या या पद्धतीत काही गैरही नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळातही हे घडत आले. मात्र राजकारणात. आता साहित्यकारणातही हा प्रयोग संघ व भाजपने पहिल्यांदा राबवला. तोही मातृभूमी असलेल्या शहरात. याचे कर्तेकरविते भाजपचे शहरातील सर्वोच्च नेते असले तरी त्यांच्या लेखी या प्रयोगापेक्षा संकुल महत्त्वाचे आहे. समाज संघमय करून टाकण्यासाठी पावले उचलणाऱ्या संघाला मात्र संस्थात्मक राजकारणात म्हणजे साहित्य संघात रस आहे. अशा दुहेरी उद्दिष्टात संघाचे स्वयंसेवक व समर्थक पराभवाच्या जात्यात भरडले गेले त्याचे काय? याचे उत्तर सध्यातरी कुणी द्यायला तयार नाही.
