वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक होवू घातली आहे. जवळपास ११ व्यक्ती अध्यक्ष होण्यास ईच्छुक आहेत. अनेकांना पूर्ण संचालक पदाचे उमेदवार पण उभे करता आले नाही. मात्र मी एकटा समर्थ अशी भूमिका घेणारे हे हौशी कार्यकारिणी बैठकीत कसा निर्णय घेतील, असा सवाल पण प्रचारात होवू लागला आहे. त्यामुळेच सख्खे मित्र हे सख्खे वैरी झाल्याचे चित्र पुढे येत आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी ४० वर्षाची मैत्री तोडत निर्णय घेतला आणि सर्व स्तब्ध झाले. इंगळे हे श्रीपाद जोशी यांच्या पॅनलतर्फे उभे आहे. त्यांचे सख्य असलेले प्रदीप दाते हे कसे निष्क्रिय व निरर्थक याची त्यांनी मिमांसाच करून टाकली.

ते म्हणतात की गत दहा वर्षातील सर्वात निरर्थक अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजन जबाबदारी घेणारा अध्यक्ष होतो म्हणतोय, हे अत्यंत हास्यस्पद. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तसेच ३० वर्षे विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. या काळात विविध साहित्य प्रवाहांना एकत्र आणत व्यापक आणि सर्वसमावेशक असे स्वरूप त्यांनी विदर्भ साहित्य संघाला प्राप्त करून दिले. डाॅ. जोशी यांचे महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मागील ४० वर्षांपासून मी स्वतःही सातत्यपूर्वक विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन उपक्रमांमध्ये कार्यरत आहे.

आम्हा वैदर्भीयांसाठी भूषणावह असणारी

विदर्भ साहित्य संघ ही संस्था गत काही वर्षांपासून अ-साहित्यिक आणि स्वयंकेंद्री लोकांच्या हातात गेली आहे. या १०३ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सारे एक होऊ या. आम्ही विदर्भ साहित्य संघ वाचवा’, हे घोषवाक्य घेऊन हा लढा उभारला आहे.असे इंगळे म्हणतात.ते व प्रदीप दाते हे ४० वर्षांपासून कौटुंबिक स्नेही. पण टीका करतांना इंगळे म्हणतात की ज्यास साहित्याचा ओ की ठो कळत नाही, ज्याचे कथित लेख मलाच लिहून द्यावे लागतात, जो साहित्यावर दोन शब्द बोलू शकत नाही त्यास अध्यक्ष म्हणून मी स्वीकारू शकत नाही. ज्याच्या नेतृत्वात वर्ध्यात झालेले साहित्य संमेलन सर्वात नौटंकी म्हणून चर्चेत आले, तो व्यक्ती अध्यक्ष व्हायला निघाला, हे दुर्दैव. मित्र आहे म्हणून साहित्यात बांडगुळ कसे स्वीकारणार, असा सवाल संजय इंगळे करतात आणि सु्बुद्ध लोकांनी ही संस्था साहित्यिक लोकांच्या हाती सोपवावी, असे आवाहन करतात.