अभिजीत फाळके, अमोल सैनवार हे कोण आहेत? ते कुणी राजकारणी नाहीत, नेते तर नाहीच. आमदार, खासदार होण्याची त्यांची मनीषा नाही. या दोघांचा जन्म केवळ विदर्भातील. त्यांचे कर्तृत्व फळाला आले ते विदर्भाबाहेर. तरीही हे दोघे व त्यांच्यासोबत असलेले अनेकजण विदर्भाच्या वेदनेशी नाते जोडतात. सध्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देऊ पाहतात. केवळ शाब्दिक दिलासा नाही, तर कृतीपर दिलासा देण्याचे काम करतात. ही गोष्ट तशी मोठीच, अगदी डोंगराएवढी, पण दुसऱ्या बाजूला राजकारण्यांचे वर्तन बघून आपली मने विषण्ण करणारी.

गेल्या दशकभरापासून विदर्भातील शेतकरी नैसर्गिक आणि राजकीय दुष्टचक्राच्या फेऱ्यात अडकला आहे. सत्ताबदल करूनही त्याच्या हाती फारसे काही लागले नाही, त्यामुळे आत्महत्यांचे दुर्देवी चक्र सुरूच आहे. बुलढाण्यात नुकतीच घडलेली तिघांची आत्महत्या बघून हे चक्र सामूहीक वळणावर येते की काय, अशी शंका अनेकांच्या मनात घर करायला लागली आहे. अशा कठीण काळात मदतीचे हात सर्वाकडून समोर यावे, अशी अपेक्षा असताना केवळ काही मोजकेच धावपळ करताना दिसणे क्लेशदायक आहे. सरकारने हे करावे, ते करावे, अशी अपेक्षा करण्याची ही वेळ नाही. आपल्या प्रदेशाची समस्या म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, यावर फार कुणी विचार करताना दिसत नाही. नेमकी हीच विषण्णता आज अस्वस्थ करणारी आहे. अभिजीत फाळकेंच्या ‘आपुलकी’ नावाच्या संस्थेने आता विदर्भातील काही शेतकऱ्यांची कर्जे फेडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या संस्थेत फाळके व एकदोघांचा अपवाद सोडला, तर सारे मुंबई, पुण्याकडील तरुण अभियंते आहेत. या सर्वाची कृती समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून सुरू झाली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या लाखोच्या घरात, त्यातील बोटावर मोजता येईल एवढय़ांचे कर्ज फेडून काय होणार?, असा नकारात्मक प्रश्न यावेळी महत्त्वाचा नाही. या कृतीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. अमोल सैनवार यांच्या शिवप्रभा ट्रस्टने अनेक शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून दिला. आता गरीब शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने लावून देण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. मुख्य म्हणजे अमोल दुबईत बसून हा सेवेचा व्याप सांभाळतो. त्याच्या संस्थेत मुंबई, पुणे, ठाणे भागातील अनेकजण आहेत. अमोलला मदत करणारे अनेक अदृश्य स्थानिक हात विदर्भातील आहेत. कोणताही गाजावाजा न करता सेवेचा हा झरा अव्याहतपणे वाहत आहे. अमोल किंवा अभिजीत ही नावे प्रातिनिधिक आहेत. अशा अनेक संस्था विदर्भात आपापल्या परीने काम करत आहेत.

या साऱ्यांना जे जमते ते राजकारण्यांना का जमत नाही? हा आताचा खरा प्रश्न आहे. हेच राजकारणी शेतकऱ्यांच्या संपर्कात सर्वाधिक असतात. यांनाच त्यांची मते हवी असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिखाऊ का होईना, पण पोटतिडकीने बोलणारे हेच असतात. प्रत्येक भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, अशी भाषा करणारी ही मंडळी व्यक्तीगत पातळीवर असा कृतीपर दिलासा देणारा कार्यक्रम का हाती घेत नाही? राजकारणात राहून रग्गड पैसा कमावणारे, त्यातून मोठे इमले बांधणारे हे लोक अशा प्रकारच्या कृतीतून काही गरजूंना नक्कीच दिलासा देऊ शकतात, पण एखाद दुसरा अपवाद वगळला तर कुठेही असे होताना दिसत नाही, हे विदर्भाचे सर्वात मोठे दुर्देव म्हणावे लागेल. राजकारणात सक्रीय आहोत म्हणून केवळ सरकारकडून मदत मिळवून देऊ, ती मिळत नसेल तर भांडू, प्रसंगी रस्त्यावर येऊ, पण स्वत:च्या खिशाला खार लावून एखादा सामाजिक उपक्रम सुरू करणार नाही, ही राजकारण्यांची मानसिकता अतिशय वेदनादायी व त्यांना समाजापासून दूर नेणारी आहे. सामूहीक विवाह सोहळे अथवा जेथे मिरवता येईल, अशाच ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायची, ही राजकारण्यांची वृत्ती सुध्दा योग्य नाही. आम्ही केवळ मते मागू, तुमच्या दु:खाचा बाजार मांडू आणि सत्तेची पदे भोगू, तुम्हाला मदत करणारे समाजसेवी भरपूर आहेत, अशी मानसिकता जर हे राजकारणी जोपासत असतील तर ते दुर्देवी आहे.

‘आपुलकी’ असो वा ‘शिवप्रभा’ किंवा अन्य कोणत्याही संस्था गरजूंना थेट मदत मिळावी म्हणून बरीच पायपीट करतात. जोडधंद्यासाठी गुरांचे बाजार फिरतात. शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी वणवण भटकतात. मुख्य म्हणजे, खरा गरजवंत शोधण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. हे करताना सरकारी यंत्रणेची मदत घेत नाहीत. अनेकदा तर त्यांना या यंत्रणेशी दोन हात करावे लागतात. त्यांची ही धावपळ समाधान देणारी असली हे सहज शक्य असताना व हाताशी मनुष्यबळ असताना सुध्दा राजकारणी हे करताना दिसत नाहीत. आज सत्तेत असलेले भाजपचे नेते विरोधात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खूप बोलायचे. आत्महत्या झाली तर मंत्र्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करा, असे म्हणण्याइतपत त्यांची मजल गेली होती. आता सत्तेत आल्यावर सरकारकडून तर सोडाच, पण वैयक्तीक पातळीवर ही नेतेमंडळी काहीच करताना दिसत नाही. पक्षाचे कार्यक्रम, पद मिळाले की, मोठे सत्कार सोहळे आयोजित करण्यावर व त्यासाठी लाखोची उधळपट्टी करण्यावरच या नेत्यांचा भर दिसतो. मध्यंतरी भाजपच्या एका प्रवक्त्याने आमदारकी मिळाली, या आनंदात दिलेल्या मेजवानीवर लाखो रुपये उधळले. शेतकरी अडचणीत आहेत, असे सांगत स्वत:चे वाढदिवस साधेपणाने साजरे करायचे व प्रत्यक्षात त्याला थेट लाभ मिळेल, असा कोणताच उपक्रम राबवायचा नाही, या दुटप्पीपणाचा अनुभव अनेक वर्षांंपासून सारे घेत आहेत. आजवर सत्ता भोगलेल्या व आता विरोधात असलेल्या कॉंग्रेस नेत्यांचे वर्तनसुध्दा यापेक्षा वेगळे नाही. मंदिराच्या उभारणीवर, मुलांच्या लग्नावर कोटय़वधीची उधळण करणारे हे नेते शेतकरी प्रश्नावर डोळे पाणावून कसे काय बोलू शकतात, हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. सत्तेत असताना सरकार पाठिशी आहे, असे नुसते म्हणत राहायचे आणि विरोधात असले की सरकार लक्ष देत नाही, असे म्हणायचे, हा खेळ कुठवर चालणार? सरकारला बाजूला ठेवा, आम्ही येतो तुमच्या मदतीला, अशी भूमिका या मातीशी इमान राखणारे शिक्षित तरुण घेऊ शकतात, तर मग याच मातीशी इमान राखण्याच्या गप्पा मारणारे राजकारणी का घेऊ शकत नाही?

– देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com