श्रीहरी अणेंच्या वक्तव्याने नवी चर्चा
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची लढाई शांततेच्याच मार्गाने पुढे नेण्याचे आवाहन करीत असतानाच दुसरीकडे आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी दिल्याने चळवळीच्या पुढच्या वाटचालीच्या मार्गाबाबत (अहिंसक की आक्रमक) आता चर्चा सुरू झाली आहे. चळवळीत काम करणाऱ्या काही नेत्यांना गांधींचा अहिंसेचाच मार्ग अजूनही योग्य वाटतो तर गांधी विचाराला सुभाषचंद्र बोस यांच्याही विचाराची जोड असावी असाही मतप्रवाह आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या, गुरुवारी दिल्लीत विदर्भवाद्यांचे आंदोलन होत आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली असली तरी त्याला मिळणाऱ्या लोकांच्या अल्प प्रतिसादामुळे ती चर्चेतच आली नाही, उलट टिकेचाच विषय ठरली. त्यामुळे प्रत्येक वेळी तेलंगण राज्याच्या आंदोलनाचे उदाहरण चळवळीचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांना दिले गेले. तेलंगणाची चळवळ हिंसक झाली होती हे येथे उल्लेखनीय. मात्र आतापर्यंत कोणत्याही नेत्याने हिंसक चळवळीचे समर्थन केलेले नाही, उलट शांततेच्याच मार्गाने हा लढा लढावा, असे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अणे यांच्या राजीनामास्त्राने या चळवळीला पुन्हा सोनेरी दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अ‍ॅड. अणे यांनी अलिकडेच केलेला नागपूर दौरा यादृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी या दौऱ्यादरम्यान संविधान चौकातील सभेत केलेले वक्तव्य चळवळीची आगामी दिशा स्पष्ट करणारे होते. चळवळ शांततेच्याच मार्गाने जाणार असा संकल्प व्यक्त करतानाच त्यांनी ‘ मला काही लोक भेटले व मी त्यांना शांत केले, मला फार काळ त्यांना शांत ठेवता येणार नाही, चळवळ हिंसक झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकारचीच असेल आणि ती वेळ फार दूर नाही, असेही अणे यांनी स्पष्ट केले होते. अणे आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध नाही, कायद्याच्याच चौकटीत राहून आंदोलन करण्यावर त्यांचा भर आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर अणे यांचे अहिंसक चळवळीला मर्यादा असल्याबद्दल केलेले वक्तव्य आश्चर्यकारक मानले जात आहे. त्यामुळेच विदर्भवादी कार्यकर्त्यांमध्ये आता याचीच चर्चा सुरु आहे.
आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर करताना अ‍ॅड. अणे यांनी राजकीय दबाव गट निर्माण करणे आणि चळवळ अधिक लोकाभिमुख करणे या दोन बाबींवर भर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय पातळीवर दिल्लीत या मुद्दय़ाला इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविणे आणि आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना जोडणे आदींचा त्यात समावेश आहे. आंदोलनाचा विचार केला तर विदर्भाच्या मागणीसाठी लढणाऱ्या विविध संघटना आहेत, अणेंच्या आगमनाच्या दिवशी या सर्व संघटनांचे नेते एका व्यासपीठावर होते. या सर्वाना सोबत घेऊन आंदोलन करताना शांततेचा मार्ग कायम राहिलच याची शाश्वती अणे यांना नसावी म्हणूनच त्यांनी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींचे संकेत त्यांच्या भाषणातून दिले असावे, अशी चर्चा आहे.यासंदर्भात अनेक वर्षांपासून विदर्भ राज्यासाठी संघर्ष करणारे कट्टर विदर्भवादी नेते अहमद कादर म्हणाले की, आम्ही आमच्या मागणीसाठी महात्मा गांधींनी दाखविलेला अहिसेंचाच मार्ग निवडला आहे, पण चळवळीतील आतापर्यंतच्या वाटचालीवरून केवळ याच मार्गाने यश मिळेल याची शाश्वती वाटत नाही, त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दाखविलेल्या मार्गाचीही जोड हवी, पुढे चालून बोस यांचाच मार्ग या चळवळीसाठी अघिक योग्य राहील असे वाटते. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रवक्ते राम नेवले म्हणाले की, अणे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढणे गैर आहे, मात्र सरकार ऐकतच नसेल तर वेगळा विचार करावाच लागेल. महात्मा गांधी यांनीही सविनय कायदेभंग आंदोलन केलेच होते.

दिल्लीतील आंदोलनात तीन हजारावर कार्यकर्ते
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार गुरुवारी ३१ मार्च रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे धरणे आयोजित करण्यात आले असून, त्यात विदर्भातील ३ ते ४ हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे, दोन दिवसात दिल्लीत हजार कार्यकर्ते पोहोचले असून गुरुवारी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह भाजपचे खासदार नाना पटोले, रिपाइंचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नितीन राऊत, जनमंचचे अ‍ॅड. अनिल किल्लोर, व्ही कन्हेक्टचे मुकेश समर्थ, अहमद कादर सहभागी होणार आहेत, असे संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी सांगितले.