नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा व पेंच व्याघ्रप्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेल्या तीन वाघिणीपैकी दोन वाघिणी सह्याद्रीत स्थिरावल्याने त्यांची रेडिओ कॉलर काढण्यात आली आहे.
वाघिणीच्या स्थलांतरणाची परवानगी
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांची संख्या पुर्ववत करणेसाठी सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, भारतीय वन्यजीव संस्था देहरादुन व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या सहकार्याने “वाघ पुनर्स्थापना हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यामध्ये सन २०१७ ते २०२२ अखेर भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढीकरिता कार्यक्रम टप्पाची आखणी करण्यात आली. सदरचा टप्पा यशस्वी झालेनंतर दुसऱ्या टप्यातील “वाघ पुनर्स्थापना”ची आखणी करण्यात आली. त्याअनुषंगाने २३ जून २०२३ला वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला ९ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या चौथ्या तांत्रिक समितिने मंजुरी प्रदान केली. त्याअनुषंगाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्पमधील ८ वाघ (३ नर व ५ मादी) वाघांचे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतरणास केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर
त्याअनुषंगाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथून सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये २० नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ ला दोन वाघिणींना रेडिओ कॉलर लाऊन यशस्वीरित्या निसर्गमुक्त करण्यात आले. सदर रेडिओ कॉलर व कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून दोन्ही वाघिणींच्या हालचालीवर वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून २४ तास सखोल निरिक्षण व अभ्यास करण्यात आला. या दोन्ही वाघिणींच्या मागील चार ते पाच महिन्यांच्या हालचालींचा व अधिवासाचा बारकाईने मागोवा घेऊन अभ्यास केलेनंतर, वनविभाग व भारतीय वन्यजीव संस्था अशा निष्कर्षास आले की, सदर दोन्ही वाघिणींनी आपल्या हद्दी निश्चित केल्या असुन, त्यांचा सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये नैसर्गीक अधिवास अंतिम झाला आहे. तसेच सदर कालावधीमध्ये दोन्ही वाघिनींनी सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये मुळ अधिवासात असलेल्या इतर तीन वाघांसोबत एकत्र वावरल्याचे कॅमेरा ट्रॅपचे माहितीवरुन सिध्द झाले आहे.
रेडिओ कॉलर काढण्याचा निर्णय
वरील सर्व नोंदीवरुन, ‘STR-T-4’ व ‘STR-T-5’ या दोन्ही वाघिणींनी सह्याद्री व्याघ्र राखीवच्या चांदोली वन्यजीव विभागामध्ये आपला नैसर्गिक अधिवास अंतिम केलेला आहे. यास्तव, सदर दोन्ही वाघिणींच्या गळयातील रेडिओ कॉलर काढणेबाबत वनविभाग व भारतीय वन्यजीव संस्था यांचे एकमत झाले. त्यानुसार ९ एप्रिलला ‘STR-T-5’ वाघीणीची कॉलर तर १० एप्रिलला ‘STR-T-4’ या वाघिणीची यशस्वीरित्या रेडिओ कॉलर काढण्यात आलेल्या आहेत. यापुढे सदर दोन्ही वाघिणींचे कॅमेरा ट्रॅपद्वारे संनियंत्रण करण्यात येणार आहे.
