नागपूर : नैऋत्य मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राकडे वेगाने सुरु असताना आता विदर्भातही वातावरणात बदल जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर विदर्भातील बहूतांश जिल्ह्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, १२ जूनपासून पावसाचे क्षेत्र वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील तापमान भारतात सर्वाधिक
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने साेमवारी जारी केलेल्या हवामान वृत्तानुसार विदर्भात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, तापमानात फार घट झालेली नाही. याउलट चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ते भारतातील सर्वाधिक तापमान ठरले. तर अमरावती येथे २५.७ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज
प्राशेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यांत ८ ते १२ जूनदरम्यान एक-दोन ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वातावरण ढगाळ राहू शकते. शेतकरी तसेच नागरिकांनी वादळी वातावरणात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
८, ९ आणि १० जून रोजी जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेची लाट अनुभवास येऊ शकते. त्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
१२ जूनपासून परिस्थितीत बदल
१२ जूनपासून परिस्थितीत काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे क्षेत्र वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचवेळी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रातील आणखी काही भागांत प्रगती केली असून पुढील तीन ते चार दिवसांत राज्याच्या उर्वरित भागातही त्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या या पुढील वाटचालीमुळे विदर्भातही लवकरच मान्सूनचे आगमन होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
