अमरावती : पुढील दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होईल. त्यानंतर १९,२०,२१ जानेवारी या कालावधीत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर २३ तारखेपासून हिमालयावर एकामागोमाग एक दोन पश्चिमी विक्षोभ धडकणार आहेत. त्यामुळे विदर्भात तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बहुतेक कडाक्याची थंडी राहण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान केंद्राचे तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.
पश्चिमी विक्षोभ (चक्राकार वारे) आणि बंगालच्या उपसागरातील परीस्थितीमुळे विदर्भात अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंशतः ढगाळ वातावरण तसेच कुठेकुठे तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकऱ्यांनी तूर सोंगणीचे वेळापत्रक काळजीपूर्वक आखावे, शक्यतोवर २२ ते २५ जानेवारी या कालावधीत तूर कापू नये, असा सल्ला प्रा. बंड यांनी दिला आहे.
संत्री उत्पादक शेतकऱ्यांनी तापमानात वाढ झाल्यास आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास नवतीवर सायट्रस सायला येणार नाही, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करावी, असे प्रा. अनिल बंड यांचे म्हणणे आहे.
तापमानाची स्थिती काय
राज्यातील काही भागात उकाडा सुरू झाला आहे. कमाल तापमानात वाढ कायम आहे, तसेच किमान तापमानही टिकून आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडी कमीच राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण भारतातील ईशान्य मान्सून हंगाम येत्या दोन दिवसांमध्ये संपण्याचा शक्यता आहे. ४८ तासांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटकातील ईशान्य मॉन्सूनचा पाऊस संपेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका कायम आहे. काल शनिवारी हरियाणातील नरौल येथे देशातील निचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर भीर येथे देशातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
राज्यातील तापमानात मात्र चढ उतार दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट दिसून आली, तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. राज्यात काल गोंदिया येथे सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील अकोला येथे किमान १४.५, अमरावतीत १३.३, भंडारा १३.६, बुलढाणा १६, ब्रम्हपुरी १२, चंद्रपूर १३, गडचिरोली १२, गोंदिया ९.८, नागपूर ११, वर्धा ११.५, वाशीम १३.४ तर यवतमाळ येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
