‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक लवकरच वाचकांसमोर

नागपूर : करोनाचे संकट मोठेच होते. या अदृश्य विषाणूपुढे अनेकांनी नाईलाजाने हात टेकले. परंतु, काही असेही होते ज्यांनी करोनारूपी संकटाला घाबरून न जाता याच संकटाचा संधी म्हणून वापर करून घेतला. करोनाच्या या दृष्टचक्रातून नव्या लढ्याची प्रेरणा घेणाऱ्या अशा लढवय्यांची दखल लोकसत्ताने यंदा ‘विदर्भरंग’ या दिवाळी अंकात घेतली आहे. लवकरच हा दिवाळी अंक वाचकांच्या समोर येणार आहे.

करोनाच्या या काळात जो आजारी पडला, त्याला अस्पृश्यासारखी वागणूक मिळाली. अशा रुग्णांसाठी डॉ. शीतल चिद्दरवार आणि त्यांचे विद्यार्थी देवदूताच्या रूपाने धावून आले. त्यांनी या काळात तयार केलेल्या रोबोटमुळे या रुग्णांना मोठाच आधार लाभला.  हळदीच्या लागवडीतून प्रगतीचे ‘कॅप्सूल’ पंकज भगत यांनी तयार केले. एकीकडे करोनाकाळात खाद्यान्न व्यवसायावर संक्रांत आली असताना ‘९३/४ सेंट्रल पर्क’ नावाचे रेस्टॉरेंट तरुणाईने उभारले. झाड कधी बोलू शकते, अशी गोष्टही मनात जिथे येत नाही, तिथे सारंग धोटे यांनी त्याला बोलके केले. तुका नावाच्या गावाला पंकज महल्ले व श्वेता ठाकरे महल्ले या ध्येयवेड्या दाम्पत्याने ग्रामहिताची पंढरी करून टाकले तर रवींद्र केसकर यांनी श्वासांची तुटू पाहणारी लय जोडली. डॉ. संतोष बोथे यांनी कृषी क्रांती घडवली तर शुभम छापेकर याने ‘इन्सॅट वॉक’ ही जगावेगळी संकल्पना समाजाला दिली. करोनाग्रस्ताच्या मृत शरीराबाबतची भीती घालवणारे डॉ. संजय ढोबळे, वीज संचयाचा प्रभावी पर्याय देणारे एनआयटीचे विद्यार्थी यांची यशोगाथा या अंकाचे आकर्षण आहे.

मुस्लीम समाजात जनजागृती करून डॉ. शोएब खान यांनी अनेकांचे प्राण वाचवले तर संदीप बानेवार यांनी मानवसेवा उभारली. वैभव गंधर्व याने वायूने प्राण वाचवले आणि करोनाला हरवून आदित्य जीवने सनदी अधिकारी झाले. या सर्वांनी संकटाला शरण न जाता या संकटातून नव्या लढ्याची प्रेरणा घेतली आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले. त्यांची ही यशोगाधा अनेकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे आणि म्हणूनच लोकसत्ताने यंदाच्या विदर्भरंग दिवाळी अंकासाठी अशा आगळ्यावेगळ्या विषयाची निवड के ली आहे.  दहा अमावस्यांच्या अंधारात करोनाकाळातील ही यशोगाथा नक्कीच समाजाला प्रकाशाची वाट दाखवेल, असा ‘लोकसत्ता’ला विश्वास आहे.