लोकसत्ता टीम

अकोला : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांची अंमलबजावणी संदर्भात राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांची राज्यस्तरावरील क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्हे माघारले आहेत. याला केवळ वाशीम जिल्हा अपवाद ठरला असून येथील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी संपूर्ण राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले. विदर्भातील बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांना कामगिरीत सुधारणा करण्याच्या सूचना मुंबई येथील आरोग्य सेवा संचालकांनी दिल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृ स्वास्थ्य, मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन यासह एकूण ३० निर्देशांकावर आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सवकांच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली जाते. जानेवारी २०२५ मध्ये विशेष चमूमार्फत सरकारी रुग्णालयांमध्ये पाहणी व पडताळणी केली होती.

माता व बालकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा, लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेही रूग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, महिलांची प्रसुती, अद्ययावत डायलिसीस सेवा, कुपोषित बालकांसाठी पोषण पुर्नवसन केंद्र (एन.आर.सी.), क्रिटीकल रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग तसेच शस्त्रक्रियांसाठी शस्त्रक्रियागृह, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तपेढी, सोनोग्राफी व सी. टी. स्कॅन यासह अन्य आरोग्य सेवांची तपासणी केली जाते. यामध्ये वाशीम जिल्हा सर्वोत्कृष्ट असल्यावर पथकाने तपासणीदरम्यान शिक्कामोर्बत केले. वाशीमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे राज्यात पाचव्यांदा प्रथम क्रमांकावर, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी देखील दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक प्रात केला. दोन्ही श्रेणींमध्ये वाशीम अव्वल ठरले.

जानेवारी महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांमध्ये वाशीम वगळता विदर्भातील इतर कुठल्याही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना स्थान मिळाले नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या श्रेणीमध्ये चंद्रपूर सहाव्या, गडचिरोली सातव्या तर अकोला दहाव्या स्थानावर आहे. जिल्हा शल्यचिकित्सांमध्ये वर्धा सहाव्या व यवतमाळ आठव्या स्थानावर राहिले.

या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कामगिरी ढासळली

सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या पाच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये बुलढाणा, पुणे, ठाणे, कोल्हापूर व जालना जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वाधिक कामगिरी खालावलेल्या पाच जिल्हा शल्यचिकित्सकांमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, गडचिरोली आणि भंडारा जिल्हा समाविष्ट आहे.

सुधारणा करण्याच्या सूचना

माघारलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रम अंमलबजावणीवर लक्ष देऊन सुधारणा करण्याच्या सूचना आरोग्य सेवा संचालकांनी दिल्या. काम असमाधानकारक असल्याने त्याचा आढावा घेऊन सुधारणा होण्यासाठी करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

Story img Loader