नागपूर : हिवाळ्यातील सकाळचे कोवळे उन्ह अंगावर पांघरायला कुणाला नाही आवडणार ! दिवाळीच्या सुट्यांमध्ये अशा कोवळ्या उन्हात दंगामस्ती करणाऱ्या लहान मुलांचे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत गावखेड्यात हमखास दिसून येत होते. हा आनंद माणूस म्हणून आपण विसरलो असलो तरी जंगलातील या मूक प्राण्यांनी हा आनंद कायम जोपासला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “कॉलरवाली” वाघीण आणि तिच्या बछड्यांची सकाळच्या कोवळ्या उन्हात चाललेली ही दंगामस्ती वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी अलगद कॅमेऱ्यात कैद केली. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील एक वाघीण “कॉलरवाली” म्हणून ओळखली जाते होती. भारतातील ही एकमेव वाघीण होती जिने तिच्या संपूर्ण आयुष्यात २९ बछड्याना जन्म दिला. त्यामुळेच तिला “सुपरमॉम” म्हणून सुद्धा ओळखले जात होते. वाघ साधारणपणे १४ ते १५ वर्षाचे आयुष्य जगतो, पण मध्यप्रदेशातील ही “सुपरमॉम” तब्बल १७ वर्षे जगली.
हेही वाचा >>> नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
अलीकडेच तिचे निधन झाले. तिचा वारसा महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “कॉलरवाली” चालवत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. ताडोबातील “लारा” आणि “वाघडोह” या वाघीण आणि वाघाची ती मुलगी असल्याचे सांगितले जाते. आता ती देखील मातृत्वाचा अनुभव घेत आहे. तिने जेव्हाही बछड्याना जन्म दिला तेंव्हा तेव्हा तिने बच्चड्यांसहित पर्यटकांसमोर येऊन पर्यटकांना खुश केले. (ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ तसेही कायम पर्यटकांना खुश करतात) ही “कॉलरवाली” वाघीण आणि तिच्या बचड्यांनी आताही पर्यटकांना असेच वेड लावले आहे. यापूर्वी तिने तीन बचड्यांना जन्म दिला होता. तेव्हाही ती तिच्या बचड्यांसह बिनधास्तपणे जंगलातील पर्यटनाच्या रस्त्यावर यायची. यावेळी मात्र तिने चार बचड्यांना जन्म दिलाय. नुकतेच डोळे उघडलेले तिचे बछडे तिच्यासारखेच बिनधास्त आहेत.
नुकताच पाऊस पडून गेलेला आणि त्यामुळे ताडोबाचे अवघे जंगल हिरवेगार झाले आहे. त्यामुळे अशा हिरवळीतून डोकावणारे कोवळे उन्ह घ्यायला हे चारही बछडे “कॉलरवाली” च्या मागोमाग जंगलातील पर्यटनाच्या रस्त्यावर आले. सकाळच्या फेरीतील पर्यटकांना त्यांची ही कोवळ्या उन्हात चाललेली दंगामस्ती अनुभवायला मिळाली. वन्यजीव छायाचित्रकार अशा संधी सोडत नाहीत।. अरविंद बंडा यांनीही तेच केले. त्यांनी हा क्षण अलगद कॅमेऱ्यात टिपला. “कॉलरवाली” वाघीण तिच्या चिमुकल्या बछड्याना बिनधास्तपणे पर्यटनाच्या रस्त्यावर घेऊन फिरते, कारण तिच्या पिलांचे रक्षण करण्यासाठी ती तेवढीच सक्षम आहे. तिच्या बछड्यांसाठी सुरक्षित अधिवास शोधतांना ती इतर वाघांसोबत भिडली आहे. अलीकडेच बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ताडोबाच्या गाभा क्षेत्रात तेलीया तलाव परिसरात ती “सोनम” या वाघिणीशी भिडली आणि तिला जखमी केले.