नागपूर : कोरोना काळात रखडलेल्या एसटी चालक, वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक ‘व्हिडीओ’ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली होती. परंतु करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. अंतिम चाचणी परीक्षेत प्रवाशांच्या जीवाची काळजी घेण्यासंदर्भातील १८ प्रकारच्या वाहतूक नियमांचे पालन एसटी चालक करतो किंवा नाही याची तपासणी केली जाते. यात अपात्र ठरू नये या भीतीपोटी प्रत्येकी २१०० रुपये गोळा केले जात असल्याचे तसेच शनिवारी लिस्ट लागणार आहे, जो पैसे देईल त्याचे नाव लिहा, न देणाऱ्यांचे नाव लिहू नका असा संवाद ‘व्हिडीओ’त आहे. हेही वाचा: गडचिरोली: ७० लाख दे, अन्यथा…; खंडणी वसुलीप्रकरणी १० नक्षल समर्थकांना अटक नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील हा ‘व्हिडीओ’ असून त्यात पात्रता परीक्षेसाठी आलेले उमेदवार दिसत आहेत. परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांकडून २१०० रुपये द्यावे लागत असल्याचे संभाषण आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सांगितले.