नागपूर : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक मतदार संघाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात नागपुरची पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीतही नाराजीनाट्य बघायला मिळत असून बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न सुरू आहेत.
उमदेवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. परंतु आतापासून विजयाचा आकडा जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी मतदारांची पळवापळवी सुरू झाली असून घोडाबाजारही सुरू झाल्याचा आरोप होत आहे.
ईव्हीएमवर नाही मतपत्रिकेवर होणार निवडणूक
ही निवडणूक ईव्हीएमवर होणार नसून मतपत्रिकेवर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मतपत्रिका मिळणार आहे. निवडणूक आयोगांने मतदानासंदर्भात काही प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार मतपत्रिकेत उमेदवारांची नावे असतील. पसंतीच्या उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. पसंतीच्या नावासमोर मतदारास १ क्रमांक लिहावा लागणार आहे. निवडणुकीत जेवढे उमेदवार रिंगणात आहे. त्या प्रत्यकाला मत देता येणार आहे.
…तर मत अवैध ठरणार
एका पेक्षा जास्त उमेदवारास मत द्यायचे असल्यास २, ३, ४ असा क्रमांक द्यावा लागेल. क्रमांक १ न लिहिता इतर क्रमांक लिहिल्यास संबंधित मत अवैध ठवण्यात येईल. १ आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या समोर लिहिला असेल तरी संबंधित मत अवैध ठरेल. दोन उमेदवारांच्या दरम्यान हा आकडा लिहिल्यासहीत मत अवैध ठरेल. पसंतीक्रम आकड्यांऐवजी शब्दात लिहिला तरी मत अवैध ठरवण्यात येईल. नावासमोर इतर कोणत्याही प्रकारच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्याच प्रमाणे विशिष्ट उमेदवाराला मत केल्याचे स्पष्ट होईल, अशा चिन्हाचा वापर केल्यासही मत अवैध ठरेल. त्यामुळे ते मत वाया जाईल.
या रंगाच्या पेनाच वापर बंधनकारक
या निवडणुकीत मतदान करताना निवडणूक आयोगाकडून विशिष्ट रंगाचा पेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर करावा लागणार आहे. इतर कोणत्याही रंगाच्या पेनाच्या वापर करता येणार नाही. पेन्सिल किंवा बॉलपेनचा वापर केल्यास मत अवैध ठरण्यात येईल. उमेदवाराच्या नावासमोर बोटाचा ठसा उमटवल्यासही मत अवैध ठरणार आहे.
१८ जूनला मतदान
१८ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २२ जूनला मोजणी होईल.
