Vidhan Parishad Election: वर्धा: निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका म्हणजे पैशाचा खेळ असे सरसकट म्हटल्या जात असते. कारण मोजके मतदार व त्यावर सर्वांची नजर. यात पक्षनिष्ठा नव्हे तर पै निष्ठा महत्वाची. जो देईल दाम त्याचे मार्गी लागेल काम. म्हणून जेव्हा तगडा उमेदवार दिला असे म्हटल्या जाते तेव्हा तो आर्थिकदृष्ट्या तगडा असा अर्थ गृहीत असतो. पक्षाने तिकीट दिली म्हणजे विजय पक्का असे स्वतः उमेदवार पण खात्री देत नाही. त्याला त्यात स्वतःचे ‘ बळ ‘ ओतावेच लागते. असे या निवडणुकीतील धुरंधर सांगतात. मतदारसंघांतर्गत १८ मे २०२६ पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम

१) अधिसूचनेची प्रसिद्धी – २५ मे २०२६, २) नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची अंतिम तारीख – १ जून २०२६, ३) नामनिर्देशन पत्राची छाननी – २ जून रोजी, ४) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख – ४ जून रोजी, ५) मतदानाचा दिनांक – १८ जून २०२६ रोजी, ६) मतदानाची वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, ७) मतमोजणी दिनांक – २२ जून रोजी, व ८) निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येण्याची तारीख – २५ जून २०२६ आहे. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी काम पाहणार.

चर्चा तीन जागेची

पण या निवडणुकीत वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली तसेच नागपूर व गोंदिया – भंडारा या तीन मतदारसंघाची चर्चा सध्या जोरात आहे. सत्तेत असणारी महायुती तीनही जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. विजयाची चटक लागलेला भाजप पक्ष या तीनही जागी उमेदवार देण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे सांगण्यात येते. नागपूर मतदारसंघात भाजपचे मतदारबळ भक्कम असल्याची आकडेवारी पुढे केल्या जात आहे. वर्ध्यात जरा अतिरिक्त ताकद लावावी लागेल. भंडारा शक्य, असे गणित भाजप नेते सांगतात. भाजपचे मित्र पक्ष सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पण दावा ठोकून आहेत.

लखानी – कुकरेजा

या तीनही ठिकाणी भाजप उमेदवार जवळपास पक्के झाल्याचे सांगितल्या जाते. वर्ध्यात पवार कुटुंबाशी सोयरीक जुळल्याने चर्चेत आलेले अरुण लखानी यांचे नाव टॉपवर आहे. एक नेता म्हणाला की ही सोयरीक आताची पण ते भाजप प्रदेशचे सह कोषाध्यक्ष आहेत हे लक्षात घ्या. त्यांचे पक्षासाठी असलेले योगदान लक्षात ठेवून त्यांचा विचार होत आहे. नागपूर मतदारसंघात डॉ. राजीव पोतद्दार हे नाव सर्वात पुढे आहे. ते फिजिशियन असून भाजपमधील एका वर्तुळत दबदबा राखून आहेत. गोंदिया येथे बिल्डर विक्की कुकरेजा यांची उमेदवारी पक्की होवू शकते. पण ते नागपूरसाठी ईच्छुक असल्याचे सांगण्यात आले. ही तीनही नावे भाजपच्या अंतर्गत गोटातील. सर्व ती ताकद लावू शकणारी, म्हणून इतर ईच्छुक मागे पडत आहे.

सुधीर कोठारी

ज्येष्ठ सहकार नेते व हिंगणघाटचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी म्हणतात मी पण ईच्छुक आहे. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मोर्चेबांधणी सूरू केली आहे. ते म्हणतात की आपण युतीतील मित्रपक्ष म्हणून वर्धा चंद्रपूर मतदारसंघात लढण्याची तयारी ठेवली. पण युती धर्म पाळू. विक्की कुकरेजा व अनिल लखानी यांच्याशी वाटघाटीत स्पर्धा राहू शकते. सध्या चर्चा सूरू आहे. या माहितीत एकाने भर टाकताना नमूद केले की लाखानी – पवार विवाह सोहळा १९ जून रोजी आहे. तर मतदान १८ जूनला होणार. म्हणून लाखानी रिंगणात उतरतील कां? पण विवाह व निवडणूक ही वेगळी बाब व त्यासाठी राबणारे वेगळे म्हणून अडचण येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

स्थानिक उमेदवार द्या

ही तीन बडी नावे चर्चेत आल्यावर अनेक भाजप नेते हिरमुसले. परिणय फुके यांनी स्पष्टपणे स्थानिक उमेदवारच द्या अशी मागणी भंडारा येथील सभेत करून टाकली. तसे वृत्त आले. एक ईच्छुक माजी खासदार रामदास तडस यांचेही नाव आहे. पण ते म्हणतात आमच्या पक्षात वरिष्ठ जो निर्णय घेतात त्याच्याशी सर्व बांधील असतात. तीच माझी भूमिका राहील. दावा करण्याची बाबच नाही, असे तडस स्पष्ट करतात. वर्धा चंद्रपूर मतदारसंघात युतीत भाजपचे तर आघाडीत काँग्रेसीचे बहुमत आहे. त्यामुळे मित्र पक्ष हक्क सांगू शकत नाही, असे बोलल्या जाते. पण आज भाजपतर्फे बलदंड नावे पुढे आल्याने इतर कोमात गेल्याचे चित्र उभे झाले आहे.