नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यातील घडामोडींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जरांगे यांच्या निकटवर्तीयांना जलसंपदा विभागाची हजारो कोटींची कामे मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

कामे थांबवल्यामुळे सरकारविरोधात भूमिका?

जरांगे-पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीला जलसंपदा विभागातील हजारो कोटी रुपयांची कामे मिळाली होती. ही कामे मुख्यमंत्र्यांनी थांबविल्यामुळेच जरांगे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली का, असा सवाल वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.
‘कामे थांबवल्यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली का? त्यामुळेच ते मुंबईला निघाले होते का?’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तसेच सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यात काही समझोता झाला आहे का, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाला न्याय मिळावा

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेला आपला कधीही विरोध नव्हता, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र, एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांना धक्का पोहोचेल, असा कोणताही निर्णय सरकारने घेतल्यास त्याला विरोध करू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजांच्या घटनात्मक अधिकारांचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ओबीसींचे सरकारने वाटोळे केले’

‘या सरकारने ओबीसींचे वाटोळे केले आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. ओबीसींच्या ३७८ जातींपैकी सुमारे २०० जातींमधील लोकांचे दरडोई उत्पन्न दोन हजार रुपयांपेक्षाही कमी असल्याचा दावा त्यांनी केला. ‘एखाद्याने ताकद दाखवली म्हणून सरकार ओबीसींचे नुकसान करीत असेल, तर जनता ते सहन करणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेल्या निर्णयांचा सामाजिक परिणाम लक्षात घ्यावा, असे ते म्हणाले.

‘दिवे लावा’ आवाहनावरून भाजपला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रमांतर्गत नागरिकांना दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनावरूनही वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली. ‘एकीकडे पंतप्रधान तेलाचा कमी वापर करण्याचा सल्ला देतात आणि दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवे लावण्याचे आवाहन करतात. देशातील कोट्यवधी लोकांनी दिवे लावले तर किती तेल खर्च होईल? जनतेच्या घरात खाण्यासाठी तेल आहे की दिव्यात टाकण्यासाठी? कोणाचे खरे मानायचे?’ असा सवाल त्यांनी केला.