नागपूर : चंद्रपूर महापालिकेतील गटनोंदणीचे प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवून भाजपला सत्तेत येण्याची संधी निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी केला. आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजप सत्ताधारी होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनोंदणीशी नगरविकास खात्याचा थेट संबंध नाही. विभागीय आयुक्तांना केवळ गटनोंदणी स्वीकारायची किंवा नाकारायची एवढाच अधिकार आहे. मात्र, हे प्रकरण महिनोमहिने प्रलंबित ठेवून सत्ताधाऱ्यांना आपले राजकारण साध्य करण्याची संधी दिली जात आहे. हा प्रकार म्हणजे थेट कटकारस्थान असून विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नव्या नियमानुसार फॉर्म क्रमांक तीन भरल्याशिवाय नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळत नाही. यासाठी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असल्याने १८ नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात हजेरी लावली होती. हे न केल्यास त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाण्याची भीती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी काँग्रेसच्या एका गटाने १२-१३ नगरसेवकांसह गटस्थापनेचा प्रयत्न केला होता, मात्र त्या गटाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. “आमची संख्या अधिक असूनही आमच्या गटाला मान्यता दिली जात नाही. हायकोर्टाचे निकाल स्पष्ट असतानाही अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
काही नगरसेवकांची निवडणूक प्रमाणपत्रे गहाळ झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणित प्रत मिळवण्यात आली. तरीही पोलिसांचा अहवाल मागवण्याचा अधिकार आयुक्तांना नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. “गॅझेट प्रसिद्ध झाल्यावर केवळ नाव आणि ओळख तपासून नोंद करणे अपेक्षित असते. प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
विभागीय आयुक्तांकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असून आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. “मी स्वतः आयुक्तांकडे जाणार असून लेखी निर्णय मिळेपर्यंत तिथून उठणार नाही. गरज पडल्यास उपोषणालाही बसेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “जणू देशाचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चंद्रपूरातून ठरणार आहेत, असा देखावा केला जात आहे. प्रत्यक्षात कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. ज्याचे संख्याबळ जुळेल त्याचाच महापौर होईल.”
उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचे सांगत, “जे जास्त देईल त्याला पाठिंबा देऊ, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट भाजपला सहकार्य करणार नाही आणि आमच्यासोबतच राहील, असा मला विश्वास आहे,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
“त्यांच्या अर्जात काही त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना पत्र देण्यात येणार आहे.”- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त

