राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

 आपल्या परंपरेत आणि राजकीय संस्कृतीत संयम, सुसंस्कृतपणा अपेक्षित असतो. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी कोणतीही वाट न पाहता शपथविधी उरकण्यात आला. या घाईमागे राजकीय गणिते असून, त्यातूनच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असताना अचानक घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षविलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत पक्षांतर्गत निर्णय घेण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक होती, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. आपल्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित नेत्यांनाच आहे की त्यासाठी भाजप किंवा मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी आवश्यक आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नागपूर : राज्यातील सत्ताकारणात अलीकडे घडलेल्या घडामोडींमागे मोठा राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.  अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा  शपथविधीचा कार्यक्रम अत्यंत घाईघाईने उरकण्यात आल्याने अनेक शंका निर्माण झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊ नयेत यासाठीच ही रणनीती आखण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.

राजकीय घडामोडींवर चर्चा होत असताना मानवी मूल्ये आणि नैतिकता बाजूला पडल्याची खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. एखाद्या मोठ्या नेत्याभोवती निर्माण झालेल्या परिस्थितीत काही काळ तरी संयम बाळगणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर विविध आरोप असल्याने त्यांना सत्ताधारी आघाडीसोबत राहणे अपरिहार्य बनल्याचा आरोप करत, या पार्श्वभूमीवरच काही विधाने आणि निर्णय घेतले जात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. संबंधित प्रकरणांबाबत निष्पक्ष चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी पुन्हा केली.

याचबरोबर चंद्रपूर महापालिकेतील महापौर पदाबाबत काँग्रेस पक्षात हालचाली सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात उद्या दिल्लीत काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.