चंद्रपूर: नगर पालिका निवडणुकीत या जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने आमचा विजय झाला. त्याच प्रमाणे महापालिका निवडणुकीतही जनतेने काँग्रेस पक्षावर प्रेम करित प्रचंड मताधिक्य दिले होते. मात्र जनतेच्या प्रेमाचा आम्ही सन्मान करू शकलो नाही. त्यामुळेच महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. आम्ही काही चुका टाळल्या असत्या तर निवडणूक जिंकलो असतो. ही आमची चुक आहे, त्यामुळे आम्ही चुकलो, आम्ही चंद्रपुरकरांची माफी मागतो या शब्दात विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत येथे सर्वाधिक ३० नगरसेवक असतांना देखील काँग्रेसचा पराभव झाला. जनतेच्या मतदान रूपी कौलाचा आम्ही सन्मान केला नाही असेही वडेट्टीवार म्हणाले. मतदारांनी काँग्रेसला जनमत दिल्यानंतरही महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पराभव झाला.त्यासाठी मी चंद्रपुरकर जनतेची माफी मागतो. केंद्रीय नेतृत्वाने अर्थात हायकमांडने मला किंवा माझ्या गटाकडे महापौर, उपमहापौर पदाची जबाबदारी दिली नव्हती. तरीही मी पक्षासाठी प्रामाणिक काम केले. पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र होते. मात्र आमचीच कुठेतरी चुकी झाली आणि त्यामुळेच आम्ही महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जिंकू शकलो नाही. या पराभवाची अनेक कारणे आहेत. आता ही कारणे सांगणे योग्य नाही. आमच्या हातातोंडाचा घास हिरवला गेला. सत्तास्थापनेत आलेल्या अपयशावर चिंतन करवे लागेल. तिकीट वाटपात थोड्या चुका झाल्या. तिकीट वाटप ही सामुहिक जबाबदारी होती.
चंद्रपुरकरांनी आम्हाला भरभरून सहकार्य करित कौल दिला होता. त्यामुळे मी चंद्रपूरकरांची माफी मागतो. तिकीट वाटपात चुका झाल्या नसत्या तर आज ४० नगरसेवक निवडून आले असते. महापौर पदाच्या निवडणूकीत ताठर भूमिका न घेता शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेतले असते तर आमचा विजय नक्की होता. आम्ही चुकलो, आम्ही चंद्रपुरकरांची माफी मागतो. काही चुका टाळणे ही आमची सामुहिक जबाबदारी होती. मात्र आम्ही आपसात भांडत राहिलो. त्यामुळे देखील आम्हाला संख्याबळ जुळविण्यात यश आले नाही अशी प्रामाणिक कबुलीच वडेट्टीवार यांनी दिली. पक्षाने एका नेत्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी सोपविली असती तर कदाचित निकाल वेगळा असता असेही वडेट्टीवार म्हणाले.दरम्यान वडेट्टीवार यांच्याकडे पहिल्या महापौर पदाची जबाबदारी सोपविली असती तर कदाचित चित्र वेगळे असते अशाही प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहे.
