अकोला : स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांचे तळवे चाटणारे सध्या राज्य व केंद्रात सत्ताधारी आहेत. ते देशभक्त कधीच होऊ शकणार नाहीत. देवाच्या नावावर मते मागणारा भाजप हा सर्वात मोठ्या भिकाऱ्यांचा पक्ष आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.

अकोला महापालिकेच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘काँग्रेसच्या विचारांचा पाईक हाच खरा देशभक्त आहे’. भाजप धर्माच्या नावाखाली लोकांच्या मनात विष पेरतो.

मंदिर, मशीदसमोर गरीब, गरजू पोटासाठी भीक मागतात. मात्र, भाजपचे नेते देवाच्या नावाने मते मागण्यासाठी गल्लोगल्ली भीक मागत आहेत. राज्यात महायुती सरकार म्हणजे लुटारूंची टोळी सत्तेत बसली आहे. यांना गरीब, ओबीसी, दलित, शोषित किंवा बारा बलुतेदारांशी काहीही देणे-घेणे नाही.’

महाराष्ट्रावर १० लाख कोटींचे कर्ज उभे केले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री केवळ स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करत राज्याची तिजोरी लुटत आहेत. निवडणुका आल्या की वेगळे लढतात. अजित पवारांना केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी बाजूला ठेवले. जे जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जाऊन बसतात, ते धर्मनिरपेक्ष कसे असू शकतात? ७० वर्षांत काँग्रेसनेच देश उभा केला.

आयत्या बिळावर नागोबा सारखे हे लोक येऊन बसले आहेत. अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. दोन दिवसांनंतर त्याच अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ‘भाजपमध्ये ये अर्धे तू खा, अर्धे आम्ही खातो,’ असे ते म्हणाले असतील. सर्व भ्रष्टाचारी भाजपमध्ये गोळा झाले आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

भाजपाच्या नेत्यांनी २० टक्क्यांप्रमाणे ८० कोटी खाल्ले

अकोला शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. भाजपवाल्यांनाच त्या खड्ड्यात टाका. योजनेचे नाव अमृत ठेवतात. मात्र, जनतेला जहर पाजतात. भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते गोदून ठेवले. जोडण्या अद्याप केल्या नाहीत. नाल्या तुंबल्या आहेत. शहरात विविध योजनेंवर ४०० कोटी रुपये खर्च केले. भाजपच्या या ठिकाणच्या नेत्यांनी २० टक्क्यांप्रमाणे ८० कोटी रुपये कमिशन खाल्ले आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.