नागपूर : राज्यात गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याने नागरिकांचे हाल होत असताना यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असून, काही भागांत हायवेवरील हॉटेल्सही इंधनअभावी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेरील काही उपाहारगृहेही बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी वाढतच असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर “बनवाबनवी” केल्याचा आरोप करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली आहे.

स्वतःच्या धोरणात्मक चुकांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ती पूर्वीच्या सरकारांवर ढकलण्याची पद्धत सुरू असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. गॅस आणि इंधन तुटवड्यासाठी ऐतिहासिक निर्णयांना जबाबदार धरणे ही सत्ताधाऱ्यांची जुनी भूमिका असल्याची टीका करण्यात आली. “सध्याच्या परिस्थितीचे उत्तर द्यायचे सोडून भूतकाळाचा आधार घेतला जात आहे,” असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घरगुती गॅस मिळण्यात होणारा विलंब, पेट्रोल पंपांवरील रांगा आणि वाढती अनिश्चितता यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लघुउद्योजक आणि हॉटेल व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

“लोकांच्या चुली विझत असताना केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून उपयोग नाही,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी तातडीने ठोस उपाययोजना जाहीर करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

काँग्रेस नेत्याची एक्सवर पोस्ट

स्वतःच्या चुकांचे खापर  दुसऱ्यांवर फोडताना भाजपला लाज वाटत नाही..पाप तुमचं आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपला घ्यायचे नसेल हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला,भाजपची ही जुनी टेप आहे. लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत?जनतेच्या  संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या! असे वड्डेट्टीवार यांनी नमुद केले.