चंद्रपूर : ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ८० लाखांपेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरवून महायुती सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केला. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आलेल्या या योजनेतील लाभार्थी महिलांनाच नंतर वंचित ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना मोठ्या गाजावाजात सुरू केली. मात्र सत्तेत आल्यानंतर सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने आपली जबाबदारी झटकली. निवडणुकीत महिलांच्या मतांचा लाभ घेतल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.या निर्णयामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्याचे राजकीय परिणाम भविष्यात सरकारला भोगावे लागतील, असा दावाही त्यांनी केला.
भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी दिली जात असल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी टीका केली. स्थानिक पातळीवर अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी उद्योगपतींना प्राधान्य दिले जात असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.
भाजपच ‘काँग्रेसयुक्त’ होत आहे
भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला होता. मात्र आता विविध पक्षांतील, विशेषतः काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याने भाजपच ‘काँग्रेसयुक्त’ होत चालल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधानपरिषदेचे उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विधानपरिषद निवडणुकांबाबत बोलताना काँग्रेस सर्व जागांवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही टीका
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शैलेंद्र अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी अग्रवाल हे काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय सचिव असून विविध राज्यांचे प्रभारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असून आरक्षणासंदर्भातील कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्तीला काँग्रेसचा पाठिंबा राहील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
