नागपूर : महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करणारे विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांसह भाजपच्या सर्वच नेत्यांंनी कॉंग्रेसवर टिकेची झोड उठवत महिला विरोधी असल्याचा आरोप केला. आता भाजपच्या महिला नेत्या नवनीत राणा या जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवलेली विषवल्ली असल्याची खरमरीत टिका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार रविवारी सकाळी नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. त्यांनी नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. नवनीत राणा या जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल, यासाठी पाणी घालून जिवंत ठेवण्यात येणारी विषवल्ली आहे, असे ते म्हणाले. महिलांवरील अत्याचारा संदर्भात जात आणि धर्म कुठे येतो? जो जात धर्म आणत असेल तो नालायक आणि हरामखोर असतो त्याला फाशी झाली पाहिजे. तिथे बुरख्यावाले नव्हते असे नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलल्या. तोंडात आले की काहीपण वाफा काढायचे का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवली तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही. राणा यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली. खरात प्रकरणावर ब्र न काढणाऱ्या नवनीत राणा मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर बावचाळल्यासारखी बोलतात. हे अत्यंत घृणास्पद आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
राणांसह खासदार बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा
खासदार अनिल बोंडे डॉक्टर आहेत. डॉक्टर रुग्णाला रक्त देताना धर्म बघत नाही. असा कुणी डॉक्टर असेल तर निषेधार्थ आहे. भाजपचे पुरस्कृत भोंदू तयार झाले आहे. धर्माधर्मात वाद लावणारी धर्मांध शक्तींना पोसले जात असून त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महिला अत्याचारात वाढ होत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. नवनीत राणा यांनी दोन धर्मात तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर तसेच खासदार अनिल बोंडे यांनी चुकीची माहिती पसरवली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
अजित पवार विमान अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करा
अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका आहे. या अपघातासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एखादा गुन्हा दाखल व्हायला नको का ? परंतु सरकार गुन्हा दाखल करायला तयार नाही. केवळ निवेदन स्वीकारून चालणार नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा थंड बसल्यात पडेल. सध्या १५० एसआयटी चौकशी महाराष्ट्रात सुरू आहे. ते सर्व थंड बसत्यात आहे. याबाबतही तेच होईल. महाराष्ट्रातील मजबूत नेता गेलेला असताना त्याचा साधा गुन्हा दाखल का होत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
