नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी मुंबईत एका कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबात तीन अपत्ये असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर नागपुरात प्रसारमाध्यमाशी बोलताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘जे म्हणतात, त्यांनी तीन अपत्यासाठी सुरुवात करावी’ असा टोला हाणला.

बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदू जर आपल्या हक्कांसाठी उभे राहिले तर जगभरातील हिंदू त्यांना मदत करतील, या भागवतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी सरसंचालक काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे, असे उत्तर देत ओबीसींचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

तीन पेक्षा कमी जन्मदर असलेला समाज नष्ट होतो. जगभरातील शास्त्रज्ञ असे सांगत आहेत. योग्य वयात लग्न आणि घरात तीन मुले असल्यास आई-वडील आणि मुलांचे स्वास्थ चांगले राहते, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. जगात विज्ञान सांगते की, जन्मदर ३ पेक्षा कमी ज्यांचा असतो ते हळूहळू लुप्त होत जातात. त्यामुळे ३ पेक्षा जास्त जन्मदर ठेवला पाहिजे. सर्व समाज ते करतात आणि सर्व देशात असे घडते.

दुसरी गोष्ट म्हणजे मला डॉक्टर सांगतात की, लग्न वेळेवर केल्यास आणि ३ अपत्य असल्यामुळे आई-वडील आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. तसेच ज्या घरात ३ अपत्य असतात ते आपपासात इगो मॅनेजमेंट शिकून जातात. त्यामुळे पुढे जावून त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात कोणतीही अडचण येत नाही. हे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे भागवत म्हणाले होते. यावर वडेट्टीवार यांनी टोला हाणला.

नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलताना त्यांनी १७ फेब्रुवारीला संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून ओबीसींच्या आंदोलनाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले. ओबीसीची जनगणना होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याच्या आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत राज्यात सगळ्या नेत्यांनी आंदोलन केले पाहिजे. जिल्हा विभाग स्तरावर मोर्चे काढून ओबीसींवरील अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी युवा संमेलन घेणार असल्याचे ते म्हणाले.

यूजीसी सुधारणामुळे अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला. महाज्योती असताना सुद्धा विद्यार्थ्यांना पैसे मिळत नाही. राज्यातील सरकारला भिक मागण्याची वेळ आली अशी टिका करीत त्यांनी दिल्लीत ओबीसींच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. जनगणनेत ओबीसींनी सहभागी होण्यासाठी घरापुढे पाटी लावावी, असे आवाहन केले.

त्या अधिकाऱ्याला जोडे मारणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिस

राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यात विवाहित महिलांना मंगळसुत्र काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावर संताप व्यक्त करीत वडेट्टीवार यांनी सूचना देणाऱ्या अधिकाऱ्याला जोडे मारणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिस दिले जाईल, असे ते म्हणाले.