नागपूर : पुण्यातील कोरेगाव जमीन प्रकरण जनतेसमोर आल्यानंतर तो व्यवहार रद्द करण्यात आला असला, तरी ” चोरी झाली नाही असं होत नाही; चोर तो चोरच” अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर तीव्र टीका केली. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
त्यांनी सांगितले की, पुणे येथील सरकारी जमीन खासगी व्यक्तींना देण्यात आली होती. अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून सरकार सुटू शकत नाही. “जमीन परत केली म्हणजे गुन्हा रद्द झाला असे होत नाही. चोरी झालीच आहे, त्यामुळे पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
सरनाईक यांना १०० कोटींची जमीन ४ कोटीला
वडेट्टीवार म्हणाले, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला मीरा रोड येथील सुमारे १०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ चार कोटी रुपयांत देण्यात आली. ही जमीन मूळतः शैक्षणिक आरक्षणाखाली होती, मात्र आरक्षण बदलून सरनाईक यांच्या संस्थेला ती देण्यात आली. “मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांकडून जमिनी लाटल्या जात आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी,” अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
विखेंकडून शेतक-यांचा अपमान
दरम्यान, वडेट्टीवार यांनी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावरही निशाणा साधला. “शेतकरी कर्ज घेतात आणि बुडवतात” असे वक्तव्य करून विखे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असे ते म्हणाले. “मोठ्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात, पण शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली की सरकार त्यांचा अपमान करते. शेतकऱ्यांना हमीभाव आणि पीकविमा द्या, मग ते काहीही मागणार नाहीत,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या शक्यतेबद्दल विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले, “स्थानिक पातळीवर आघाड्यांचे अधिकार दिले आहेत. महायुतीतील पक्ष वगळता इतरांसोबत स्थानिक स्तरावर आघाडीचा निर्णय घेतला जाईल.”
