नागपूर : ‘जेन झी’च्या अहिंसक आणि संघटित आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून, हा लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे, असा दावा विधानसभेतील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग थेट पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचे त्यांनी म्हटले.

‘२३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतरही सरकार गंभीर नव्हते’

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही केंद्र सरकारची भूमिका संवेदनशील नव्हती. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली आणि ‘जेन झी’ने रस्त्यावर उतरून आंदोलनाची धुरा सांभाळली. सरकारला हे आंदोलन मोडून काढता येईल, चिरडून टाकता येईल, असा विश्वास होता. मात्र, तरुणांनी अहिंसेच्या मार्गाने सातत्यपूर्ण लढा उभारला आणि सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. हा लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर’

सरकारने आंदोलनकर्त्यांवर दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. आंदोलनादरम्यान तरुणांवर लाठीमार करण्यात आला, अनेकांच्या डोक्यात मार लागून रक्त सांडले. आंदोलनकर्त्यांना पाणी व अन्न मिळू नये, यासाठीही अडथळे निर्माण करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. साध्या वेशातील पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिस अधिकारी व साध्या वेशात मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

‘तरुणांच्या एकजुटीमुळे आंदोलनाची धार कायम’

‘जेन झी’च्या एकजुटीमुळे आंदोलनाची ताकद कायम राहिली, असे सांगताना वडेट्टीवार म्हणाले की, हा विजय केवळ तरुणांचा नसून ‘कोकरोच’ संघटनेचा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचाही आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर नेले. विरोधी पक्षांनी संसदेतही सरकारला धारेवर धरल्याने सरकारवरील दबाव अधिक वाढला, असे त्यांनी सांगितले.

देशभर आंदोलनाचे पडसाद

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशातील विविध राज्यांत उमटले आणि त्याची झळ थेट पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. बारा वर्षांनंतर मोदी सरकारला केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा स्वीकारावा लागला, यावरून सरकार बॅकफूटवर गेल्याचे स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या अलीकडील वक्तव्याचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, युवक सरकारविरोधात उभा राहिल्याने सरकारला भूमिका बदलावी लागली आणि पंतप्रधानांनाही या विषयावर सार्वजनिक भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली.