नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याची टीका करत त्यांनी संबंधितांकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांवरील कारवाईवर संताप
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संदर्भातील त्यांची चित्रफीत रविवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. वडेट्टीवार म्हणाले, ज्यांनी स्वतः अनेक वर्षे आंदोलने केली, तेच आज विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणत आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. नैतिकता जपायची असेल तर संबंधितांनी राजीनामा दिला पाहिजे.
‘एका मंत्र्यांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठ्या’
सरकार एका मंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. एका मंत्र्यांना वाचवण्यासाठी मुलांची डोकी फोडली जात आहेत. लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तर ते सर्व दहशतवादी ठरतात का? मग देशातील अर्धी जनता दहशतवादी झाली असे म्हणायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेच्या मोहात सरकारचे विचार लुळे-पांगळे झाले असून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दडपशाहीच्या दृष्टीने पाहिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनम वांगचूक यांचे रुग्णालयातूनही उपोषण
पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व अनियमिततेच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २८ जूनपासून जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. उपोषणाच्या २१व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरही त्यांनी रुग्णालयातूनच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या असून आंदोलनकर्त्यांनी सरकारवर लोकशाही हक्कांचे दमन केल्याचा आरोप केला आहे.
लाठीहल्ल्याचे आरोप
आंदोलनात सहभागी असलेले अभिजीत दिपके यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच शांतता मार्चदरम्यान आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. २० जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या शांतता मार्चमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडींनंतरही जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच असून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी तेथे एकत्र येत आहेत. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
