नागपूर : राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत आरक्षणाच्या मर्यादेमुळे गेल्या वर्षभरापासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के मर्यादेत या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या निवडणुका सरकार केव्हा घेईल, हे अद्याप स्पष्ट नाही. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्केच्या मर्यादेत निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. ओबीसीला २७ टक्के आरक्षण असताना काही ठिकाणी जागाच मिळणार नाही. तर अनेक जिल्हा परिषदांमधील जागा कमी होणार आहे. राज्यात २०० जागा कमी होतील. त्यामुळे कॉंग्रेस नेते व विधानसभेतील गट नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर हल्लाबोल केला.

२७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका हव्या

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. परंतु आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने ओबीसींचे आरक्षण शून्य करण्यात आले. ओबीसीचे आरक्षण शून्य कसे होऊ शकते? परंतु, न्यायाधीशांनी तसा निर्णय दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय मागील वेळी निवडणुका झाल्या. त्यावेळी बांठिया समितीच्या माध्यमातून आरक्षण परत मिळविण्याचा प्रयत्न केला. बांठिया समितीमुळे २० टक्केच आरक्षण निश्चित झाले. परंतु इच्छा नसताना तो अहवाल मान्य करावा लागला. काहीच नसल्यापेक्षा २० टक्के महत्त्वाचे होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर मोठी टीका केली होती. सरकारने योग्यप्रकारे बाजू मांडली नसल्याने आरक्षण मिळाले नसल्याचा आरोप केला होता. परंतु आता सरकारने काय केले? ओबीसींना सरसकट २७ टक्के आरक्षण नाही. ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे मोठे नुकसान होत आहे. हे सरकार ओबीसींचे नुकसान करणारे आहे. यापूर्वीच यांनी नुकसान केले. आताही नुकसान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुका २७ टक्के आरक्षणानुसारच झाल्या पाहिजे. २७ टक्के आरक्षण मिळत नसेल तर जनगणना झाल्यावर ती घेतली पाहिजे. चार वर्ष तशाही निवडणुका झाल्या नाही. आणखी काही वर्ष लागतील, असे ते म्हणाले.

ईडब्ल्यूएस १० टक्के आरक्षण कसे दिले?

ईडब्ल्यूएस आरक्षण कुणाची मागणी नसतानाही लागू करण्यात आले. शासकीय सेवा आणि शिक्षणात हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. यामुळे आरक्षण ६० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग ५० टक्केची मर्यादा फक्त ओबीसीसाठीच का, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ओबीसींचे आरक्षण शू्न्य करण्याचा निर्णयही योग्य नव्हता, असे ते म्हणाले.