नागपूर: भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्तीचा विचार मनात येत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना थेट भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे, तर त्या भाजपमधून बाहेर पडल्यास काँग्रेस त्यांचे ‘शंभर टक्के स्वागत’ करेल आणि महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्रीपदासाठीही पूर्ण साथ देईल, असे मोठे विधान त्यांनी केले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पंकजा मुंडे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भंडारा येथे मंडल यात्रेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.

पक्षात न्याय मिळत नसल्याची भावना असावी

पंकजा मुंडे यांच्या अलीकडील वक्तव्यांचा संदर्भ देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपमध्ये त्यांना अपेक्षित सन्मान आणि न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली असावी. त्यांच्या कुटुंबाने पक्षासाठी दिलेल्या योगदानाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. पंकजा मुंडे या राज्यातील प्रभावी ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचार करण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे. अशा निर्णयाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी त्या भाजप सोडल्यास काँग्रेसमध्ये प्रवेश मिळेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी, पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडल्या तर काँग्रेस त्यांचे शंभर टक्के स्वागत करेल, असे स्पष्ट उत्तर दिले.

पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या?

परळीतील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी रस्त्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त केली होती. रस्त्यावर इतके खड्डे पाहिले की राजकारणाचा कंटाळा आला. विकासासाठी एवढे प्रयत्न करूनही अनेक प्रश्न सुटत नाहीत. कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे वाटते. मात्र जनतेचा उत्साह पाहिला की पुन्हा काम करण्याची उभारी मिळते.

वडेट्टीवारांची ऑफर नेमकी काय?

-पंकजा मुंडेंनी भाजप सोडावे, असे खुले आवाहन
-ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची सूचना
-काँग्रेसमध्ये शंभर टक्के स्वागत करण्याची तयारी
-महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचा दावा
-पंकजा मुंडे यांच्या ‘राजकारणातून निवृत्ती’च्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू
-भाजपमधील त्यांच्या स्थानाबाबत सातत्याने राजकीय चर्चा
-वडेट्टीवारांच्या ऑफरमुळे विरोधकांकडून नवे राजकीय संकेत
-पंकजा मुंडे या या वक्तव्यावर किंवा ऑफरवर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष