चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेता बदलाच्या हालचाली सुरू असतानाच काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतचे मतभेद संपल्याची जाहीर घोषणा केली. मुंबईत आयोजित काँग्रेस कार्यक्रमात धानोरकर यांचे नाव घेत त्यांनी, ‘‘आजपासून आमचे सगळे मतभेद आणि भांडणे संपली आहेत. काँग्रेस पक्षात मतभेद आणि भांडण संपवून काम केले पाहिजे. चंद्रपूरपासून त्याची सुरुवात करतो,’’ असे जाहीर केले
वडेट्टीवार यांच्या या घोषणेमुळे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीच्या राजकारणाला ब्रेक मिळाला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील गटनेतृत्वावरून पुन्हा एकदा हालचाली सुरू असतानाच हा सूर उमटल्याने या घोषणेकडे राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
सप्टेंबरमध्ये वडेट्टीवार गटाकडून विद्यमान गटनेत्याला हटविण्यासाठी हालचाली झाल्याचे वृत्तही समोर आले होते. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसकडे सर्वाधिक २७ नगरसेवक असतानाही महापौरपदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर गट आमनेसामने आले होते. पक्षश्रेष्ठींनी तडजोडीचा फॉर्म्युला काढण्याचा प्रयत्न केला; मात्र अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेसला महापालिकेतील सत्ता राखता आली नाही. या संघर्षाचे पडसाद गटनोंदणी आणि गटनेतेपदाच्या राजकारणातही उमटले. लोकसभा निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय दुरावा चर्चेत राहिला. त्यानंतर विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकीत या संघर्षाने वेगवेगळी रूपे घेतली. त्यामुळे आता ‘‘मतभेद संपले’’ या वडेट्टीवारांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेतील सत्ता हातातून गेल्यानंतर काँग्रेसने आता अंतर्गत कलहाऐवजी संघटनात्मक एकजुटीचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र, घोषणेची खरी राजकीय परिणामकारकता आगामी काळातील दोन्ही गटांच्या प्रत्यक्ष भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वडेट्टीवारांनी थेट खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव घेत मतभेद संपल्याचे जाहीर केले असले, तरी धानोरकर यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया काय असते, याकडे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत संघर्षाच्या बातम्यांनी गाजलेल्या या जोडीने आता खरोखरच हातमिळवणी केली, तर चंद्रपूर काँग्रेसच्या राजकारणाची दिशा बदलू शकते; अन्यथा ‘भांडण संपले’ची घोषणा केवळ राजकीय व्यासपीठावरील आणखी एक संवाद ठरू शकते. दरम्यान या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
