नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारी वाटपावर आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. भाजप धनदांडग्या उद्योगपतींना आणि आयारामांना जवळ करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले , भाजपला वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणारे आणि तळागाळात काम करणारे स्थानिक कार्यकर्ते महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यांना कार्यकर्त्यांपेक्षा धनदांडगे उद्योगपती अधिक जवळचे वाटू लागले आहेत. यामुळे पक्षासाठी रक्त-घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांवर मोठा अन्याय होत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.
‘काँग्रेसमुक्त’चा नारा देणारा भाजप आता ‘काँग्रेसयुक्त’
भाजपने विधान परिषदेसाठी काँग्रेस आणि इतर पक्षांमधून आलेल्या आयारामांना दिलेल्या संधीवर वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला. एकेकाळी ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपची परिस्थिती आता पूर्णपणे उलटी झाली आहे. आज भाजप स्वतःच ‘काँग्रेसयुक्त’ झाला आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे भाजपची मूळ वैचारिक ओळखच आता पूर्णपणे पुसली गेली आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात; भाजपला पराभवाची भीती
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरली असून पक्षाचे सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने किसान सेलचे राष्ट्रीय सचिव आणि विविध राज्यांचे प्रभारी राहिलेले शैलेंद्र अग्रवाल यांना रिंगणात उतरवले असून, ते अत्यंत भक्कम उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजपकडे संख्याबळ आणि मोठी ताकद असतानाही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची घोषणा केली नाही, यावरून त्यांच्या मनात पराभवाची भीती स्पष्टपणे दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला.
ओबीसी आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचा ‘डीएनए’ ओबीसी असल्याचा दावा करतात; मात्र, प्रत्यक्षात ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. ५० टक्क्यांच्या मर्यादेचे कारण पुढे करून जर ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे सरकार पूर्णपणे ओबीसीविरोधी आहे हे सिद्ध होते. ओबीसींच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने घटनादुरुस्तीची गरज असून, संसद किंवा विधानसभेत अशा कोणत्याही घटनादुरुस्तीला काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.
