नागपूर : मनोहर भिडे यांच्या राष्ट्रध्वजासंदर्भातील वक्तव्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दांत टीका केली. भिडे यांच्या वक्तव्यांतून विकृत मानसिकता आणि देशविभाजनाची भूमिका दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘मनोहर भिडेंना कोण विचारते?’
सांगलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रेतील पोस्टरमधून ‘अखंड हिंदुस्थान’ आणि भगव्या राष्ट्रध्वजाची भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विचारसरणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना वडेट्टीवार यांनी, ‘मनोहर भिडेंना कोण विचारते?’ असा सवाल केला. समाजात अवैज्ञानिक आणि अतार्किक कल्पना रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत असल्याचे ते म्हणाले. अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून, समाजमनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
आंब्याच्या वक्तव्याची आठवण
आंबे खाल्ल्याने मुलं होतात, अशा अवैज्ञानिक कल्पना समाजाच्या माथी मारणाऱ्या मनोहर भिडे यांच्याकडून आता पुन्हा विकृत मानसिकतेतून विधाने केली जात असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. विज्ञान आणि तथ्यांना छेद देणाऱ्या अशा विधानांमुळे समाजात चुकीचे संदेश जातात. सार्वजनिक जीवनात बोलताना जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रध्वजाच्या रंगांवर प्रश्न
राष्ट्रध्वजाच्या रंगांबाबत भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरही वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांवर विकृत मानसिकतेतून प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तिरंगा राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्याबाबत बोलताना संवेदनशीलता आणि जबाबदारी आवश्यक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
‘देशविभाजनाची भूमिका’
राष्ट्रध्वजाच्या रंगांवर प्रश्न उपस्थित करण्यामागे देशाच्या विभाजनाची भूमिका असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. अशा प्रकारची वक्तव्ये समाजात गैरसमज आणि दुही निर्माण करणारी ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले. देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी समाजात फूट पाडणाऱ्या विचारांना विरोध करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भिडे यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
