चंद्रपूर: दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२३ जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील नागभीड येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, अन्यायाविरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवली. यावेळी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करीत केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘लोकशाहीत विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे अयोग्य’
वडेट्टीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित प्रश्न अत्यंत संवेदनशील असून सरकारने त्यावर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे अपेक्षित आहे. मात्र, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा आणि बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन हा घटनात्मक अधिकार असून, त्यावर दडपशाही करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘ड्रग्जच्या धमकीचा आरोप गंभीर’
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असले, तरी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असतील, तर ती अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा धमक्या देण्यासाठी संबंधितांकडे ड्रग्ज आले कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या भूमिकेचा उल्लेख
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, राज्यभर काँग्रेसने आंदोलन छेडले असून अनेक ठिकाणी पालकही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, सरकार चर्चा टाळून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेपरफुटीवर सरकारला धारेवर धरले
स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना वडेट्टीवार यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक परीक्षा वादग्रस्त ठरल्याचा दावा केला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. विरोधकांवर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह
शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरही वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितले जात असल्याचा आरोप करत, लाभार्थी यादीतील गोंधळामुळे अनेक शेतकरी अद्यापही वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी ठोस भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नागभीडसह जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनाची तयारी करण्यात आली असून, या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
