चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात अखेर विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार गटाचे राजेश मुरली अडूर यांनी बाजी मारली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी ५ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण आदेश देत खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची गटनेतेपदाची नोंदणी रद्द केली आणि पुन्हा राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड झाल्याची नोंद अधिकृत अभिलेखात घेतली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटनेतेपदाच्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर ६ फेब्रुवारीला या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी करून राजेश अडूर यांची सर्वानुमते गटनेतेपदी निवड केली होती. मात्र, १६ जून रोजी संगीता भोयर यांच्यासह १६ नगरसेवकांनी ठराव सादर करून अडूर यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली. त्यानुसार २१ जुलै रोजी विभागीय आयुक्तांनी अडूर यांची नोंद रद्द करून सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी नोंद केली. या निर्णयाला अडूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या १५ नगरसेवकांनी बैठक घेऊन पुन्हा अडूर यांची गटनेतेपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला. या ठरावावरील स्वाक्षऱ्यांची सत्यता तपासण्यासाठी ७ ऑक्टोबरला प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी १५ नगरसेवकांनी उपस्थित राहून स्वाक्षऱ्या आपल्याच असल्याचे मान्य केले. दरम्यान, अडूर यांनी या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० ऑक्टोबरच्या आदेशानुसार न्यायालयाने विभागीय आयुक्तांना प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी बहुमताचा विचार करून अडूर यांच्या बाजूने निर्णय दिला. २७ पैकी १५ नगरसेवकांचा पाठिंबा अडूर यांना असल्याने गटनेतेपदाची निवड लोकशाही प्रक्रियेनुसार बहुमताने झाल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. अखेर अडबाले यांची नोंदणी रद्द करून अडूर यांना पुन्हा अधिकृत गटनेते म्हणून मान्यता देण्यात आली.
एकाच गटात वारंवार नेतृत्वबदल
न्यायालयीन लढाया आणि बहुमताच्या दाव्यांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. आता विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर तरी हा नेतृत्वाचा खेळ थांबणार की नव्या न्यायालयीन लढाईला सुरुवात होणार, हा प्रश्न कायम आहे.
