चंद्रपूर: पोलिस शिपाई दिलीप चव्हाण यांच्या हत्येनंतर पोलिस दल सक्रीय झाला आहे. होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व शांततेचे वातावरण राहावे यासाठी जिल्ह्यातील ६४१ नोंद असलेल्या गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अन्वये तडीपार व गाव परिसरात प्रत्यक्ष अटक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यापैकी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी यांनी ५१८ गुन्हेगारांवर गावबंदीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या जिल्ह्यात कोळसा, वाळू, तंबाखू, दारू, गुटखा, ऑनलाईन क्रिकेट बेटिंग तथा इतर गुन्हे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राजकीय व पोलीस दलाच्या आशीर्वादाने हे सर्व गुन्हे फोफावले आहेत. पोलिस शिपाई दिलीप चव्हाण यांच्या हत्या प्रकरणानंतर पोलिस दल सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बियर बार, ढाबा तथा पाणठेले अशा १६ प्रतिष्ठानवर कारवाई केली आहे. त्यानंतर आता गुन्हेगार यांच्यावर गावबंदी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील ५१८ गुन्हेगार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. धुलीवंदन मध्ये जिल्ह्यात शांतता राखावी असे आवाहन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.