वर्धा: गावाच्या कौलारू शाळेत शिक्षण. गुरुजींनी घडविले. या शाळेस पदोपदी गावकरी मदत करायचे. लहान मुलांना गावाकरीच वर्गणी गोळा करीत खाऊ द्यायचे. शाळा म्हणजे गावच्या कुटुंबाचा एक भाग, असा विचार ठेवणाऱ्या गावासाठी आपण पण काही केले पाहिजे, अशी भावना. हे पांग फेडले पाहिजे, अशी भावना उंच भरारी घेतलेल्या दामिनीने ठेवली. आणि नावातील चमक प्रत्यक्षात दाखवून दिली.
सेलू तालुक्यातील कोटंबा या लहानश्या खेड्यातील मुलीची ही गोष्ट. गावच्या माजी सरपंच रेणुका कोटंबकार व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोटंबकर यांची कन्या असलेल्या दामिनी हिने वसतीगृहात राहून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळात नौकरी सूरू केली. हाती पैसा व घरी मदत करायची गरज नाही म्हणून स्वतःच्या मजेसाठी तो खर्च करण्याची भावना ठेवणारे अनेक. पण दामिनीने हाती जमा पैसा गावासाठी काही करायचे या भावनेने खर्च करायचा निर्णय घेतला. गावात विविध कामे अपेक्षित. पण आवश्यक काय, तर सार्वजनिक निवारा. गावातील मुलं बाहेरगावी शिकायला जातात. एसटी किंवा ऑटोची वाट बघावी लागते.
त्यासाठी उन्हात तर कधी पावसात आडोसा बघून थांबणे आलेच. म्हणून मग खर्चाचा अंदाज घेत तिने पैसा जमा केला. गावात एक चांगला मजबूत सार्वजनिक निवारा बांधण्याचे ठरविले. बांधकाम पूर्ण झाले. या कोटंबा गावात सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सूरू आहे. त्याचे औचित्य साधून दामिनीच्या संकल्पनेतील ‘ आठवणींचा निवारा ‘ लोकार्पण करण्यात आला. उदघाटन प्रसंगी गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे व सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर प्रामुख्याने हजर होते. साक्षीला गावातील कन्येचे कौतुक करण्यास गावकरी होतेच. सामाजिक दायित्व ही भावना जोपासत दामिनी हिने केलेले कार्य पाहून शिक्षकांनी पण तिची पाठ थोपटली.
या आठवणीचा निवारा बद्दल बोलतांना दामिनी म्हणते की शाळेत असतांनाच मी बाल विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट बघायला मिळत होती. हे सार्वजनिक काम असल्याने निधी जमेल तेव्हा निवारा बांधू, अशी सरपंच असलेली आई सांगायची. मग विचारणा करणे सोडून दिले. माझे पैसे जमले आणि हे कार्य मार्गी लागले. आता गावातील विद्यार्थ्यांची सोय तर होईलच. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून तसेच गप्पा करण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होईल. एक दोन वृत्तपत्रे पण ठेवायचा विचार करतेय. पेयजल सोय करण्याचा पण विचार करणार. खूप मोठे काम केले किंवा गावाचे भले केले अशी भावना मुळीच नाही. आपण सुरवात केली तर गावातील मोठ्या हुद्यावर पोहचलेले मुलं पण गावासाठी काही करतील, अशी प्रेरणा हे काम देईल. अशी भावना दामिनी व्यक्त करते. ती सध्या पुण्यात निवासी असून तिथे पण भूमी या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी जुळली आहे.

