नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पात पवनी वनपरिक्षेत्रालगतच्या गावांमध्ये दहशत पसरवणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले होते. मात्र, पेंच प्रशासनाने या वाघिणीऐवजी वाघाला जेरबंद केल्याच्या तक्रारी गावकऱ्यांपासून तर वन्यजीवप्रेमींनी केल्या आहेत. दरम्यान, गावकऱ्यांनीच पेंच प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलन कशासाठी ?
मंगळवार, १७ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता झिंझरिया गावातील शेतात काम करणाऱ्या नीता कुंभारे या महिलेवर वाघिणीने हल्ला करुन तिला ठार केले. याशिवाय गेल्या दोन ते तीन महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात या परिसरातील पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती, मात्र, तिला जेरबंद न करता वाघाला जेरबंद करण्यात आले. ही वाघीण अजूनही झिंझेरिया गावातच फिरत असल्याचा दावा गावकरी करत आहेत.
हेही वाचा – आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
नियमाचे उल्लंघन कुठे ?
शनिवार, २१ सप्टेंबरला सायंकाळी सिल्लारीजवळील राधेश्याम भलावी यांच्या शेतात आलेल्या वाघाला वनखात्याच्या पथकाने सायंकाळी सुर्यास्तानंतर बेशुद्ध करुन जेरबंद केले. मात्र, सुर्यास्ताच्या पूर्वीच साडेपाच वाजता वाघाला बेशुद्ध करण्यात आले. तो पूर्णपणे बेशुद्ध होण्यास सात वाजले, असा दावा पेंच प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर कोणताही वन्यप्राणी पूर्णपणे बेशुद्ध होण्यासाठी जास्तीतजास्त १५ ते २० मिनिटाचा कालावधी लागतो. याशिवाय प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचे आदेश दिले. तसेच प्रादेशिक विभागातील एका वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात दुसऱ्याच वाघाला जेरबंद करण्यात आले.
हेही वाचा – विषबाधेमुळे अल्पवयीन बहीण-भावाचा मृत्यू; आदिवासी कुटुंबातील ८ सदस्यांना…
प्रशासनाचे आश्वासन फोल ?
हल्ल्याच्या घटनेनंतर रविवार, २२ सप्टेंबरला ग्रामस्थांची बैठक घेण्याचे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात या गावात पेंच प्रशासनातील कोणताही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही. मुख्य वन्यजीव रक्षक, जिल्हाधिकारी यांनी या परिसराला भेट द्यावी, वनमंत्र्यांनी भेट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वनमंत्र्यांनी गावात जाण्याऐवजी गावकऱ्यांनाच नागपुरात बोलावून घेतले. त्यामुळे गावकऱ्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.
वनमंत्री काय म्हणतात ?
प्राथमिक प्रतिसाद दलाचा (पीआरटी) वापर का केला जात नाही, असा प्रश्न वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. त्यांना पेंच फाऊंडेशनमधून मानधन द्या आणि गावातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना यात सहभागी करा. गावकऱ्यांना मुखवटे देऊन त्याचा वापर करण्यास सांगा, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. प्रत्यक्षात हा उपाय काही वर्षांपूर्वीच तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सुचवला होता आणि नागपूर वनविभागाने तो अंमलात आणला होता.