वर्धा: पोल्ट्रीफार्म अर्थात कुक्कुटपालन व्यवसाय गावासाठी धोक्याचा म्हणून तो हटवण्याची मागणी समुद्रपूर तालुक्यातून झाली आहे. चिखली या गावात असलेला पोल्ट्रीफार्म गावातील बालक व वृद्ध लोकांच्या जीवावर उठला आहे. त्वरित त्याची परवानगी रद्द नं केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा गावाकऱ्यांनी प्रशासनास दिला आहे.

कुक्कुटपालनचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. रोजगार देणारा म्हणूनच नव्हे तर बक्कळ कमाई देणारा व्यवसाय म्हणून त्याकडे पाहल्या जात आहे. एका माजी आमदाराने तर कोट्यावधी रुपये ओतून पोल्ट्री फार्म बांधणे सूरू केले आहे. पण हा व्यवसाय सूरू करण्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत. काही निर्बंध आहेत. त्याचे पालन अनिवार्य. ते होत नसल्यास पर्यावरण विषयक संस्था हस्तक्षेप करीत तो बंद पाडू शकतात. नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल अर्थात राष्ट्रीय हरित लवाद या पर्यावरण विषयक सर्वोच्च संस्थेने एका प्रकरणी हस्तक्षेप केल्याचा दाखला आहे.

एका पोल्ट्री व्यवसाय प्रकरणात १० डिसेंबर २०२१ रोजी दिलेले निर्देश आहेत. ५ हजार पेक्षा अधिक पक्षी ( कोंबड्या ) एकाच ठिकाणी असलेल्या केंद्रास ते बांधण्याची व चालविण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. जल अधिनियन अंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अशी परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे राष्ट्रीय हरित लवाद स्पष्ट करतो.

दुर्गंधी व माश्या घोंगावणे असे प्रकार होवू नयेत म्हणून निवासी परिसरापासून पोल्ट्रीफार्म ५०० मिटर दूर असावेत. नदी, तलाव, कालवे अश्या मोठ्या व विहिरी व तत्सम छोट्या जलस्रोत पासून १०० मिटर दूर बांधावे. दुर्गंधीचा त्रास होवू नये म्हणून राष्ट्रीय महामार्गपासून १०० मिटर व राज्य मार्गपासून ५० मिटर अंतर असले पाहिजे. गावरस्ते, पांधन, गाव जोडणारे मार्ग यापासून १० ते १५ मिटर दूर हा व्यवसाय करावा. गावातील शेतापासून पोल्ट्रीचे शेड दहा मिटरच्या आंत असू नये. असे प्रमुख निर्बंध आहेत.

या व्यवसायाच्या तक्रारी पाहून १ जानेवारी २०२३ रोजी पशु संवर्धन खात्याने काही नव्या सूचना केल्यात. तीन प्रकारे विभागणी करण्यात आली आहे.  ५ ते २५ हजार पक्षी असलेला लघु,  २५ हजार ते १ लाख पक्ष्यांचा मध्यम तर त्यापेक्षा अधिक पक्षी असलेला मोठा, असे वर्गीकरण करीत नियम करण्यात आलेले आहेत.पिल्लांना मोकळे फिरता येईल असे शेड असावे. त्यातील करण्यात आलेल्या प्रत्येक रांगेत ४ पक्षीच असले पाहिजे. बंद पाईपलाईन मार्फत निप्पल असलेल्या नळातून पाणी पुरवावे.

खाद्य सहज खाता येईल, अशी सोय असावी. अन्य बऱ्याच सूचनांचे व नियमांचे पालन कुक्कुट पालन व्यवसाय करतांना करायचे आहे. जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा भेट देत नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. म्हणून होत असलेल्या तक्रारी तपासून व्यवसाय चालू ठेवायचा की बंद करायचा, हे संबंधित खात्यास ठरविणे क्रमप्राप्त ठरेल.